वजन काटा बंद ; शेतकऱ्यांचे नुकसान

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारातील वजन काटा गेल्या १५ ते २०  दिवसांपासून बंद झाल्याने बाहेरुन येणाऱ्या शेतमालाच्या गाड्यांना एपीएमसी बाहेर वजन करण्यासाठी वाट पहावी लागत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात उशिराने शेतमाल दाखल होत आहे. यामध्ये बटाटा लवकर खराब होत आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात उशिराने बटाटा दाखल होत असल्याने त्याची विक्री करण्यासाठी विलंब होत आहे. परिणामी बटाटा खराब होत आहे.

एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात दररोज परराज्यातील आणि राज्यातील १५० ते २०० गाड्या शेतमालाची आवक होत असते. या शेतमालाच्या गाड्यांचे प्रवेशद्वारावर वजन करुन शेतमालाच्या गाडीला एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात प्रवेश दिला जातो. यासाठी बाजार समिती १०० रुपये शुल्क देखील घेते. मात्र, गेल्या १५-२० दिवसांपासून एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील वजन काटा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान होत आहे. एपीएमसी मार्केट बाहेर वजन केल्यानंतर आत मध्ये गाडी येते. 

शेतकऱ्यांना आधी एपीएमसी मार्केट बाहेर वजन करण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारात माल दाखल होण्यास उशीर होत असून, तोपर्यंत बाजारातील ग्राहकांची खरेदी वेळ संपते. एपीएमसी मार्केट मध्ये दाखल झालेला शेतमाल विक्रीसाठी पुढील दिवसावर ढकलला जात आहे. कांदा आणि लसूण दीर्घ काळ टिकणारे आहेत. मात्र, बटाटा लवकर खराब होतो.

एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात उत्तरप्रदेश मधून बटाटा दाखल होत असून, बटाट्याला हवा लागली नाहीतर लवकर कुजत असून त्याला पाणी सुटते. सध्या बाजारातील लिलावगृहात बटाटे ठेवले जात असून, दुसऱ्या दिवसापर्यंत बटाटा कुजून त्यातून पाणी बाहेर येत आहे. परिणामीे लिलावगृहात बटाटा कुजून दुर्गंधी देखील पसरली आहे. त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील वजन काटा लवकर सुरु करावा, अशी मागणी कांदा-बटाटा व्यापारी करीत आहेत.

दरम्यान, एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात उशीरा दाखल होणाऱ्या बटाट्यापैकी जवळ जवळ ५० टक्के बटाटा खराब होत आहे, अशी माहिती कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इर्शाळवाडी आपद्‌ग्रस्तांना घरांची प्रतिक्षा