‘शिष्यवृत्ती परीक्षा'मध्ये नमुंमपा शाळांतील ४९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

५ वीच्या परीक्षेत राजर्षि शाहू महाराज विद्यालयाची तनुश्री टावरे नवी मुंबईत पहिली

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या इयत्ता आठवी ‘पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा'मध्ये नमंमा शाळा क्र.४२, घणसोली येथील विद्यार्थिनी दिप्ती कैलास पाटील ८४.५६ टक्के गुण संपादन करीत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शाळांमधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे ‘नमुंमपा'च्या ‘शिक्षण व्हिजन'चा नावलौकिक अधिक उंचावला आहे. यावर्षी नमुंमपा शाळांमधील इयत्ता ५वी मधील २८ आणि इयत्ता ८वीतील २१ असे एकूण ४९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.    

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतून इयत्ता ५ वी तील ३,३९४ विद्यार्थी आणि इयत्ता ८ वी मधील २,६३१ विद्यार्थी असे एकूण ६,०२५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी इयत्ता ५ वी तील ३,२४६ विद्यार्थी आणि इयत्ता ८ वी तील २,५०१ विद्यार्थी अशा एकूण ५,७४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

यामध्ये नवी मुंबई महापालिका शाळांतून इयत्ता ५ वीतील ५५९ आणि इयत्ता ८ वीतील ५२१ असे एकूण १,०८० विद्यार्थी दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. त्यापैकी इयत्ता ५ वीतील २८ विद्यार्थी आणि इयत्ता ८ वीतील २१ विद्यार्थी अशाप्रकारे एकूण ४९ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले.

या विद्यार्थ्यांमधून इयत्ता आठवीच्या ‘पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा'मध्ये दिप्ती कैलास पाटील (शाळा क्र.४२, घणसोली) ८४.५६ टक्के गुण संपादन करून ठाणे जिल्ह्यातून आणि अर्थातच नवी मुंबई क्षेत्रातून सर्वप्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे. तसेच इयत्ता ५वीच्या ‘पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा'मध्ये तनुश्री निलेश टावरे (राजर्षि छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र.५५, रबाले) ७८.९१ टक्के गुण प्राप्त करुन नवी मुंबई क्षेत्रातून सर्वप्रथम आलेली आहे. या दोन्ही विद्यार्थिनींची तसेच सर्वच गुणवत्तापात्र विद्यार्थ्यांची कामगिरी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असून यादवारे नवी मुंबई महापालिकेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक दर्जाचा नावलौकिक उंचावला आहे.

नमुंमपाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शिका, तज्ञांचे मार्गदर्शन लाभले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या ‘सराव परीक्षा'ही घेण्यात आल्या होत्या. त्यासोबतच विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शनही करण्यात आले होते. याशिवाय शाळा स्तरावर शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदशन, जादा तासिकांचे नियोजन करण्यात आले होते. याचा एकत्रित परिणामातून सदरचे यश विद्यार्थ्यांनी संपादन केले असून विद्यार्थ्यांसोबत त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी शिष्यवृत्तीपत्र विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केलेले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पनवेल महापालिका, विसपुते कॉलेज यांचा जैवविविधता संवर्धनपर उपक्रम