मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान'मध्ये १ लाख झाडे लावण्याचा संकल्प

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान'मध्ये आतापर्यंत २७,३३७ झाडे लावण्यात आली असून १ लाख झाडे लावण्याचे लक्ष्य महापालिका १५ ऑगस्ट पूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान'मध्ये कृषी दिनाचे औचित्य साधून १ जुल रोजी बाळकुम येथील ‘मुंबई विद्यापीठ'च्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या समारंभास महापालिका आयुक्त सौरभ राव, ‘मुंबई विद्यापीठ'चे कुलगुरु रवींद्र कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त (उद्यान) सचिन पवार, उपायुक्त (परिमंडळ-३) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील, उपकेंद्रांचे संचालक अद्वैत वैद्य, जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, आदिंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपणाची सुरुवात महाराष्ट्राचे राज्यफूल असलेल्या ‘ताम्हण' या झाडाच्या रोपणाने करण्यात आली. यावेळी ताम्हण वृक्षाचे वैशिष्ट्य आणि महत्त्व ‘वृक्ष प्राधिकरण'चे वृक्षाधिकारी केदार पाटील यांनी सांगितले. सद परिसरात एकूण ३०० झाडे लावण्यात आली. त्यात ताम्हणसोबतच, बकुळ, जांभूळ, कडुनिंब, कांचन, बेहडा, महोगनी, बांबू आदिंचा समावेश आहे. जोशी-बेडेकर महाविद्यालय आणि देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालय यांच्या एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी उपकेंद्र परिसरातील वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत रोटरी क्लबच्या सदस्यांनीही वृक्षारोपण केले.

‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान'चे कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांनी स्वागत केले. तसेच उप केंद्र परिसरातील उपक्रमांची माहिती दिली.

ठाणे महापालिका तर्फे ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन'निमित्त महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कॅडबरी नाका येथे वृक्षारोपण करुन ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान'ची सुरुवात करण्यात आली. महापालिका क्षेत्रातील शासकीय तसेच खाजगी जागांवर १५ ऑगस्ट पर्यंत १ लक्ष स्थानिक प्रजाती, विशेषतः बांबू लागवड करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. सदर अभियान अंतर्गत आतापर्यंत २७,३३७ झाडे लावण्यात आली आहेत. उर्वरित झाडांच्या रोपणाचे नियोजन करण्यात आले आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार झाडे लावली जात आहेत.

२०४ शाळा-महाविद्यालयातून वृक्षदिंडी...

‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान'चा संदेश घरोघरी नेण्यासाठी ठाणे महापालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळा यांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळांच्या परिसरात छोटेखानी वृक्षदिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील १२९ मनपा शाळा, ७० खाजगी शाळा आणि ५ महाविद्यालये अशा एकूण २०४ शाळा आणि महाविद्यालयातील सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपआपल्या परिसरामध्ये वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपण केले. त्यांनी ५४०० वृक्षरोपांची लागवड केली. विविध ठिकाणी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांसह महापालिका उपायुक्त (पर्यावरण) अनघा कदम आणि मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान सहभागी झाल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा या घोषणेचा गजर केला. झाडांच्या कुंड्या, फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी शाळांच्या परिसरात वृक्षदिंडी काढली. वृक्ष दिंडी आणि वृक्षरोपणासाठी रोपे, खत तसेच वृक्ष संवर्धन घोषणांचे फलक, आदि साहित्य सर्व शाळांना ‘वृक्ष प्राधिकरण'तर्फे देण्यात आले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिका साठी बेमुदत साखळी उपोषण