पनवेल महापालिकेच्या सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांचा सत्कार

पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात १ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान स्वच्छ भारत मिशन शहरी २.० अंतर्गत ‘सफाई अपनाओ-बिमारी भगाओ' अभियान राबविण्यात येणार असून या ‘अभियान'चे उद्‌घाटन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाले. यावेळी स्वच्छतेची शपथ सर्वांनी घेतली.

याप्रसंगी डॉ. सुप्रिया सहस्त्रबुध्दे, ‘एमजीएम'च्या डॉ. आश्लेषा तावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकिय आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आनंद गोसावी, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, घनकचरा-आरोग्य विभागाचे विभागप्रमुख अनिल कोकरे, पशुधन अधिकारी डॉ. भगवान गीते, डॉ. मनिषा चांडक, डॉ. आकाश ठसाळ, महापालिकेचे सर्व वैद्यकिय अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अरुण कांबळे, सर्व आरोग्य निरीक्षक, एनएम, जीएनएम, आशा सेविका, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता आणि आरोग्य यांचे केंद्र शासनाने एकत्रीकरण करण्याचे ठरविले आहे. सफाई कर्मचारी, बहुउद्देशीय कर्मचारी, आशा वर्कर्स या आपल्या यंत्रणेमार्फत आपण शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, तर आपण सर्व घरांपर्यत पोहोचणार आहोत. यामुळे महापालिका क्षेत्रात रोगराई टाळणे शक्य होणार आहे. सदर आरोग्यदायी कार्यक्रम आपण जास्तीत जास्त यशस्वी करुया, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले.

यावेळी डॉ. सुप्रिया सहस्त्रबुध्दे यांनी अतिसार आणि आरोग्य शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. कोरोना गेल्यानंतर आपण हात धुण्याचे महत्व आपण विसरलो आहोत. अतिसारामध्ये पाणी महत्वाचे असून लिंबूपाणी, नारळ पाणी, ताक, ओआरएस असे पदार्थ घेणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. आश्लेषा तावडे यांनी अतिसारामध्ये झिंक आणि ओआरएस उपयुक्त असून नागरिकांना याचे महत्व पटवून दिले पाहिजे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ पाणी  पिणे महत्वाचे आहे. यासाठी पाणी  २०-२५ मिनिटे उकळून पिणे, पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरीनच्या गोळ्या, मेडिक्लोर थेंब पाण्यात मिसळावे. तसेच शारिरीक स्वच्छता, हात धुण्याची पध्दत याबद्दलची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमात उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.

दरम्यान, १ जुलै या ‘आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे'चे औचित्य साधून आयुवत मंगेश चितळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते महापालिका कार्यक्षेत्रात १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, २ आपला दवाखाना अणि ६ आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान'मध्ये १ लाख झाडे लावण्याचा संकल्प