नवीन कायदे राबविण्यास नवी मुंबई पोलीस सक्षम  

नवी मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या नवी कायद्याच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी वर्षभरापूर्वीपासूनच तंत्रज्ञान आणि फॉरेन्सिक सायन्स, तपास आणि चाचण्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी सुरु केलेली यथार्थ प्रणाली, आय-बाईकसह, नेल्सन सिस्टीम, ई-पैरवी, एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम, एव्हीडन्स मॅनेजमेंट सिस्टीम-व्हेईकल तसेच डिस्पॅच व्हॅन असे सर्व उपक्रम इतर राज्यातील पोलीस दलांसाठी पथदर्शी ठरणार आहेत.  

केंद्र सरकारने १ जुलै पासून नव्याने पारित केलेल्या कायद्यानुसार तांत्रिक-सुसंगतता, तंत्रज्ञान-फॉरेन्सिक सायन्स, तपास आणि चाचण्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुढील काळात घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यासह डिजीटल पुरावे देखील महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस दलाला त्या अनुषंगाने आवश्यक असलेले संगणकीय-इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन डिव्हाईस, डिजीटल पुरावा गोळा करण्यासाठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. त्यासाठी सर्व पोलीस दलांना आपली यंत्रणा अद्यावत करण्यासाठी १ वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे.  

दरम्यान, ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून मिशन कन्विक्शन अंतर्गत दोष सिध्दीची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने गत वर्षभरामध्ये नवी मुंबईत दाखल होणाऱ्या गुन्ह्याच्या तपासामध्ये योग्य अन्वेषण होण्याच्या दृष्टीने अनिवार्य असलेला संगणकीय-इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन डिव्हाईस, डिजीटल पुरावा गोळा करणे सुलभ व्हावे याकरिता यथार्थ आणि आय-बाईक या प्रणालीची सुरुवात करण्यात आली. ‘यथार्थ'मध्ये डिजीटल पुरावे गोळा करताना ऑडीओ, व्हिडीओ रेकॉर्डोंग, साक्षीदार, पंच यांच्या डिजीटल सह्या, ६५ बी प्रमाणपत्र तयार करणे, अचूक वेळेची नोंदणी करणे सुलभ होत आहे.  

सर्व पोलीस स्टेशन्सला यथार्थ किट आणि विभागात येणाऱ्या पोलीस स्टेशनला आय-बाईक देऊन त्यावरील सर्व अधिकारी, अंमलदारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच ‘आय-बाईक'मध्ये गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी शास्त्रोक्त पध्दतीने पुरावा गोळा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने पुरावा गोळा करणे, ते जतन करणे आणि परीक्षणासाठी न्यायसहाय्यक प्रयोगशाळेला सुस्थितीत आणि सुरक्षितरित्या पाठविले जात आहेत.  त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलिसांनी फिर्यादी, साक्षीदार यांना समन्सची बजावणी करण्यासाठी ई-पैरवी या ऑनलाईन ॲपचा वर्षभरापासून वापर सुरु केला आहे. त्यामुळे पोलीस ठाणे मधून, ‘ई-पैरवी कक्ष'मधून समन्सची बजावणी करणे पोलिसांना शक्य झाले आहे. त्यामुळे मनुष्यबळाची बचत होऊन कामाचा अतिरिक्त ताणही कमी झाला आहे. तसेच समन्स बजावणीच्या प्रमाणात वाढ देखील झाली आहे.  

नवी मुंबई पोलिसांनी नवीन कायद्याच्या अनुषंगाने आपल्या पोलीस दलात वर्षाभरापूर्वीपासून नेल्सन सिस्टीम, एव्हीडन्स मॅनेजमेंट सिस्टीम, एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम-व्हेईकल तसेच डिस्पॅच व्हॅन असे उपक्रम सुरु केले आहेत. या सर्व उपक्रमांमुळे मनुष्यबळ वाचत आहे. तसेच टेक्नॉलॉजीचा सुध्दा वापर होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी सुरु केलेले सर्व उपक्रम राज्यातील इतर पोलीस दलांसाठी पथदर्शी ठरत आहेत.
-मिलिंद भारंबे, पोलीस आयुवत-नवी मुंबई. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 सोशल मिडियाच्या आहारी न जाण्याचा सल्ला