लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्तीचे मनसे तर्फे वाटप

नवी मुंबई  : २६ जून रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष गजानन काळे ह्यांनी नवी मुंबईतील गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनी ह्याच्याकरिता शैक्षणिक शिष्यवृत्तीची घोषणा केली होती. त्यानुसार नवी मुंबईच्या विविध भागात राहणाऱ्या विधवा, घटस्फोटीत, मोलमजुरी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, समाजातील विविध घटकातील पालकांच्या ११ मुला- मुलींची निवड करण्यात आली त्या  शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम मनसे मध्यवर्ती कार्यालयात जेष्ठ कामगार नेते रमेश हरळकर व सामाजिक कार्यकर्त्या फुलनताई शिंदे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. 

कोविड कालावधी नंतर सर्व सामान्यांच्या नोकरी आणि व्यवसायाचा मोठा यक्ष प्रश्न उभा राहिलेला होता , बऱ्याच पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल सुद्धा तडजोडी कराव्या लागल्या, या संवेदनशील पार्श्वभूमीवर नवी मुंबई मनसेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.

सदर कार्यक्रमावेळी  पालक, विद्यार्थी ह्यांच्याशी संवाद साधताना गजानन काळे गरजू मुलांसाठी करत असलेल्या कौतुकास्पद कार्याचा उल्लेख करत  कामगार नेते रमेश हरळकरांनी सदर उपक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्या , तसेच सामाजिक कार्यकर्त्या फुलनताईनी त्यांच्या संस्थेतर्फे या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्याचे जाहीर केले. शाहू महाराजांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी करायची असेल तर त्यांच्या कार्याचा आदर्श घेत समाजासाठी आपण काही देणं लागतो ह्या भावनेनी ती साजरी व्हावी म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात आल्याचे तसेच पुढील वर्षी ५१ गरजू विद्यार्थ्यांना मनसेच्या वतीने शिष्यवृत्ती देण्याचा मानस गजानन काळेंनी याप्रसंगी व्यक्त केला.

मनसेने दिलेली शिक्षणासाठीची ही ओंजळ आमच्या करिता मोठी मदत असल्याची भावना पालकांनी कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाला मनसेचे सचिन कदम, अभिजित देसाई, आप्पासाहेब कोठुळे, संदेश डोंगरे, अमर पाटील, अमोल आयवळे, योगेश शेट्टे, भूषण कोळी, अर्जुन सोनावणे, संजय शिर्के, सनप्रित तुर्मेकर, अनिकेत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 बेलापूर गावाचा होणार विकास!