पोलीस भरती मैदानी चाचणीवेळी तरुणाचा मृत्यू  

राज्य राखीव पोलीस बल क्र.११, नवी मुंबई कॅम्प मधील घटना  

 नवी मुंबई : बाळेगाव शिळफाटा येथील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) गट क्रं-११, नवी मुंबई कॅम्प करिता सुरु असलेल्या पोलीस भरती दरम्यान २९ जून रोजी संपन्न झालेल्या मैदानी चाचणीदरम्यान अत्यवस्थ झालेल्या ७ उमेदवारांपैकी एका तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर आणखी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यासह अन्य अत्यवस्थ उमेदवारांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.  

पोलीस भरतीदरम्यान मृत झालेल्या तरुणाचे नाव अक्षय मिलींद बिऱ्हाडे (२५) असे असून तो जळगांव येथील अंमळनेर येथे राहत होता. अक्षयने राज्य राखीव पोलीस बल गट क्रं-११, नवी मुंबई कॅम्पच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता. २९ जून रोजी बाळेगाव, वाकळण येथील ‘एसआरपीएफ'च्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरु होती. पुरुष उमेदवारांमध्ये ५ कि.मी. धावण्याची चाचणी सुरु असताना ७ उमेदवारांना चक्कर येऊन ते कोसळले. त्यामुळे त्यांना तत्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला.  

यातील दुसरा उमेदवार प्रेम सुखदेव ठाकरे (२९) अत्यवस्थ असून त्याच्यावर तसेच अमित गायकवाड (२०), पवन शिवाजी शिंदे (२५), अभिषेक शेटे (२४), सुमित किशोर अदाटकर (२३), साहिल किशोर लावण (१९) या सर्वांवर छत्रपती शिवाजी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.  

दरम्यान, अक्षयला हृदय विकाराचा झटका आला की त्याने काही सेवन केले होते? याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्युचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याबाबतची नोंद डायघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  

राज्य राखीव पोलीस बल गट क्रं.११, नवी मुंबईच्या वतीने बाळेगाव वाकळण येथील ‘एसआरपीएफ'च्या कॅम्पमध्ये ३४४ सशस्त्र पोलीस शिपाई पदांकरिता २४ जूनपासून भरती प्रक्रिया सुरु आहे. २९ जून रोजी मैदानी चाचणीसाठी उमेदवारांची ५ कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येत असताना सदर दुर्दैवी प्रकार घडला. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 देशात आता आय.पी.सी. नव्हे भारतीय दंड संहिता