दहावी नंतर नेमके काय? मार्गदर्शनासाठी मिरा-भाईंदर महापालिकेचा पुढाकार

भाईंदर : रोजगार क्षमता शाळेत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांमध्ये रुजू झाली पाहिजे या उद्देशाने मिरा-भाईंदर महापालिका  आयुक्त संजय काटकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली २७ जून रोजी सेंटर ऑफ एक्सलेंस इन एज्युकेशन अंतर्गत एम्प्लॉयबिलिटी-१८ करिअर गायडन्स कार्यशाळा महापालिका हद्दीतील इयत्ता ९वी आणि इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त कल्पिता पिंपळे, सहाय्यक आयुक्त (शिक्षण) संजय दोंदे, करियर तज्ञ चंद्रकांत मुंडे, सेंटर ऑफ एक्सलन्स मधील महेश रसाळ, करियर सल्लागार प्रीती गंजू यांच्यास कार्यशाळेस ७०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

मिरा-भाईंदर महापालिका शाळेतील विद्यार्थी वयाच्या १८व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभे राहून भविष्यात एक कर्तबगार नागरिक व्हावे यासाठी त्यांना लागणाऱ्या मार्गदर्शनाकरिता सेंटर ऑफ एक्सलेंस इन एज्युकेशनची स्थापना करण्यात आली आहे. शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे दहावी आणि ती उत्तीर्ण झाल्यावर पुढे नेमके काय करायचे? असा संभ्रम प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांमध्ये असतो. त्यामुळ आयुक्त संजय काटकर यांनी सदर संभ्रम दूर करण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतून ‘एम्प्लॉयबिलिटी-१८'च्या शीर्षकाखाली मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील ३६ शाळेतील नववी आण दहावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी करियर गाईडन्स मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते.

करिअर मार्गदर्शन सत्रामध्ये व्यावसायिक आणि कौशल्य-आधारित संधींवर लक्ष केंद्रित करुन विविध करिअर मार्गांचा शोध घेऊन सदर मिशनवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी आयुक्त काटकर यांनी विद्यार्थी आणि पालकांशी सक्रियपणे संवाद साधून त्यांच्या करिअरच्या आकांक्षांची माहिती समजून घेतली. सेंटर ऑफ एक्सेलन्स मधील महेश रसाळ यांनी तत्काळ रोजगार आणि कौटुंबिक आधारासाठी व्यावसायिक करिअरचे मूल्य अधोरेखित केले. करिअर सल्लागार प्रीती गंजू यांनी वास्तववादी उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी आणि कुशल व्यावसायिकांसाठी परदेशात संधी शोधण्याबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान, करिअर तज्ञ चंद्रकांत मुंडे यांनी वैयक्तिक सामर्थ्य आणि बाजारपेठेतील संधींसह करिअर निवडींचे संरेखन करण्याच्या महत्त्वावर भर दिला. अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण सुविधांसह सज्ज असलेल्या बससह लेंड अ हँड इंडियाचा नाविन्यपूर्ण स्किल्स ऑन व्हील्स उपक्रम, कार्यक्रमस्थळी प्रदर्शित करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये शिकण्याचा उत्साह निर्माण झाला. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

एसएससी सराव परीक्षेतील  गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप