खारघर मधील झाडे वाचविण्याची पर्यावरण प्रेमीची मागणी

खारघर : पावसाळा सुरु झाल्यामुळे खारघर परिसरात वृक्षप्रेमीकडून वृक्षरोप लागवड केली जात आहे. मात्र,खारघर मधील  ‘सिडको'च्या सेंट्रल पार्क शेजारील नियोजित ‘खारघर कार्पोरेट पार्क'च्या भूखंडाचे सपाटीकरण करताना झाडांच्या चोहोबाजूंनी खोदकाम केल्यामुळे झाडांची मुळे उघडी पडली आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यात  सदर झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असल्याने निसर्गाने दिलेली झाडे ‘सिडको'ने वाचवावीत, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

मुंबई शहरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) धर्तीवर सिडको तर्फे खारघर येथील सेन्ट्रल पार्क आणि पेठपाडा मेट्रो स्थानक शेजारी असलेल्या  मोकळ्या भूखंडावर खारघर कार्पोरेट पार्क उभारण्यात येणार आहे. या राखीव भूखंडावर, पिंपळ, कडूलिंब आणि इतर मिळून जवळपास ७० पेक्षा अधिक मोठी झाडे आहेत. या मोकळ्या भूखंडावर दरवर्षी होणाऱ्या विविध कार्यक्रमांदरम्यान खोदकाम करुन मैदान सपाटीकरण करताना निसर्गाने दिलेल्या झाडांची मुळे उघडी पडली आहेत. पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यास सदर झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. पर्यावरण जतन आणि संवर्धन आता लोकचळवळ व्हावी यासाठी एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करुन वृक्षारोपण करीत आहे. दुसरीकडे खारघर मधील डोंगरावर काही पर्यावरण प्रेमी गेल्या दहा वर्षांपासून वृक्षरोपांची लागवड करुन त्यांचे संगोपन करीत आहेत. मात्र, निसर्गाने दिलेल्या झाडांची काळजी सिडको प्रशासन घेत नसल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

दरम्यान, खारघर कार्पोरेट विभागात विचारणा केली असता, सदर भूखंडावर असलेल्या झाडांची हानी होवू नये यासाठी सिडको उद्यान विभागाला कळविले जाणार आहे, असे सांगण्यात आले.

खारघर कार्पोरेट भूखंडावर असलेल्या झाडांच्या चोहीबाजूने खोदकाम केल्यामुळे झाडांची मुळे बाहेर पडली आहेत. पावसाळ्यात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडू शकतात. त्यामुळे झाडे संवर्धनासाठी ‘सिडको'ने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. - गणेश पेडामकर, सल्लागार - आदर्श सेवाभावी संस्था, खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळेगाव खाडीकिनारी स्वच्छता मोहीम