नवी मुंबई शहरातील खदान तलाव बनताहेत मृत्यूचे सापळे?

वाशी : नवी मुंबई शहराच्या पूर्वेला असलेल्या डोंगराळ भागात दगडखाणींमुळे डबके तयार झाले आहेत. पावसाळ्यात या डबक्यात तरुण मुले पोहण्यासाठी जातात. मात्र, पाण्याचा अंदाज येत नसल्याने दरवर्षी या डबक्यात बुडून तरुणांचा मृत्यू होत आहे. यंदा देखील तुर्भे परिसरात एका तरुणाचा  डबक्यात बुडून मृत्यू झाला असून, त्याच्या मृत्यूचे कारण एक आठवड्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.

नवी मुंबई शहरातील पूर्व दिशेला दखडखाणी, क्वाऱ्या चालत असत. १९९७ मध्ये पर्यावरणाचा मुद्दा पुढे करत शिवसेना-भाजप सरकारने नवी मुंबई शहरातील दखडखाणी, क्वाऱ्या कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सदर दगडखाणी बंद केल्यानंतर येथील दगडखाणीत पावसाळ्यात पाणी भरु लागले. पावसाळ्यात नवी मुंबईतील पाणी ठिकाणच्या पर्यटन स्थळांवर बंदी असते.त्यामुळे तरुण मुले निर्जन तलावात पोहण्यासाठी जातात. मात्र, पाण्याचा अंदाज येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू होत आहे.९ जून रोजी देखील तुर्भे एमआयडीसी विभागात असलेल्या स्टोन क्वारीच्या पाण्यात पोहायला गेलेल्या पाच मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मस्ती मध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा पाय पाण्यामध्ये खेचला आणि त्यामुळे बुडून एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. सदर घटना त्याच्या मित्रांनी लपवून ठेवली होती. मात्र, तुर्भे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तांत्रिक तपास करुन या मृत्यूचा छडा एक आठवड्यानंतर लावला.

या प्रकरणी चारही मित्रांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी गुन्हा कबूल केला आहे. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती ‘तुर्भे पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस  निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मधील झाडे वाचविण्याची पर्यावरण प्रेमीची मागणी