महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
डीपीएस फ्लेमिंगो तलाव मनपाला हस्तांतरित करा –आ. गणेश नाईक
नवी मुंबई : तीस एकरचा डीपीएस फ्लेमिंगो तलाव नवी मुंबई महापालिकाकडे मिळवून देण्यासाठी पर्यावरणवाद्यांच्या मोहिमेला आमदार गणेश नाईक यांनी पाठिंबा दिला आहे. नेरुळ जेट्टीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे जलवाहिनी कोरडी पडल्यानंतर फ्लेमिंगोच्या मृत्यूची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) प्रमुख खंडपीठाने स्वत:हून दखल घेतल्याने हा तलाव अलीकडेच चर्चेत आला होता.
सिडकोने केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्याच्या वन विभागाने नेरुळ जेट्टीचे बांधकाम करताना भरतीच्या पाण्याच्या मुक्त प्रवाहात अडथळा आणू नये म्हणून घातलेल्या अटींचे उल्लंघन केले आहे.
सिडकोनेच वन संवर्धन कायद्यांतर्गत पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार नाही, असे हमीपत्र दिले असले तरी तलावाच्या दक्षिणेकडील मुख्य जलवाहिनी बंद करण्यात आली होती, याला वनविभागाच्या पाहणीतून पुष्टी झाली आहे, असे नॅटकनेक्ट फाऊंडेशन संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. नाईक यांच्या सूचनेनुसार, मनपा अधिकाऱ्यांनी दोन वॉटर चोक पॉइंट्स साफ केले. त्यानंतर सिडकोने महापालिकेच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. सिडकोने तलावाच्या आजूबाजूला ‘प्लॉट’ वर अतिक्रमण केल्यास कारवाई केली जाईल, असे फलक लावले आहेत.
जैवविविधता समृद्ध डीपीएस फ्लेमिंगो तलावाचे व्यापारीकरण करण्याचा हा सिडकोचा डाव आहे, असे कुमार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचे सांगितले. तसेच सरोवर संवर्धन आणि देखभालीसाठी नवी मुंबई महापालिकाकडे सोपवण्याची विनंती देखील केली. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. कुमार म्हणाले, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मेलवर कारवाईची स्थिती जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत आमच्या अर्जावर सरकारकडून प्रतिसादाची वाट पाहत आहोत.
सिडकोने नवी मुंबई महापालिकाकडे 25 तलाव हस्तांतरित केले आहेत. पण, डीपीएस फ्लेमिंगो तलाव आणि एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ जमिनीवर सिडकोचे नियंत्रण आहे. एनआरआय आणि टीएस चाणक्य यांच्या दुहेरी पाणथळ जमिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, सिडकोने डीपीएस तलावावर रिअल इस्टेट विकसित करण्याची योजना आखली आहे.
दरम्यान, बी.एन. कुमार यांनी नाईक यांच्याशी पर्यावरणाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सिडकोकडून होत असलेल्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित केला. डीपीएस फ्लेमिंगो सरोवर संवर्धन आणि देखभालीसाठी नवी मुंबई महापालिकाकडे सुपूर्द करणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी मान्य केले.
तलाव वाचवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल पर्यावरण आणि नागरिकांच्या गटांचे कौतुक करून आमदार नाईक म्हणाले की, ते सरकारमध्ये योग्य ती भूमिका मांडतील.