महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्विकासाला टक्केवारीचे ग्रहण?
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजार आवारातील सर्व इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, सदर प्रकल्पात अनेक घटकांना टक्केवारी हवी असल्याने कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रकल्प पुढे सरकत नसल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्विकासाच्या कामाचा नारळ फुटत नसल्याने या मार्केट मधील व्यापाऱ्यांना स्वतःचा जीव मुठीत धरुन व्यापार करावा लागत आहे.
नवी मुंबई महापालिका तर्फे वाशी मधील एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील सर्व इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या बाजारात सुमारे २५० पेक्षा अधिक व्यापारी घाऊक कांदा, बटाटा आणि लसूण विक्रीचा व्यवसाय करतात.
त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील इमारतींचा पुनर्विकास करणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यादृष्टीने हालचाली देखील सुरु आहेत. परंतु, एपीएमसी प्रशासनाककडे निधी उपलब्ध नसल्याने एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील इमारतींचा पुनर्विकास खाजगी विकासकामार्फत करण्याचा पर्याय पुढे आला आहे. संपूर्ण कांदा-बटाटा बाजार २१ एकर परिसरात उभारण्यात आला आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात आधीच चटई निर्देशांक शिल्लक असून, प्रोत्साहन विकास नियंत्रण नियमावली जाहीर झाल्याने त्यात आणखी वाढ होणार आहे. या चटई क्षेत्राच्या निर्देशांकाकडे अनेक घटक नजरा लावून आहेत.त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी असलेला एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवार विकासकांना फायदेशीर ठरणार असून, यासाठी राजकीय नेत्यांसह प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी पुनर्विकास कामात अडसर तयार केला असल्याची चर्चा बाजार आवारात रंगू लागली आहे.त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्विकासाच्या कामाला टक्केवारीचे ग्रहण लागल्याने विकासाचे घोंगडे अजूनही भिजत पडल्याचा आरोप होत आहे.
--------------------------------------
एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात अनेक वर्षांपासून व्यापारी व्यापार करत आहेत.त्यामुळे पुनर्विकासाच्या बाबतीत त्यांच्या काही मागण्या आहेत.मात्र, एपीएमसी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना यातून प्रचंड पैसा कमवायचा असून, व्यापाऱ्यांवर अधिक बोजा टाकायचा आहे. त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्विकासात सगळी सेटिंग असून जोपर्यंत या सेटिंग मधून काही देवाण-घेवाण होत नाही तोपर्यंत एपीएमसी कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्विकासाचे काम काही होणार नाही. - नरेंद्र पाटील, माजी आमदार- माथाडी कामगार नेते.