महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
महापालिका सीबीएसई स्कूल प्रवेश प्रकिया लांबणीवर
वाशी : नवी मुंबई महापालिका मार्फत सीबीएसई शाळा मधील सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन देखील अद्याप सीवूड्स मधील सीबीएसई शाळेतील नर्सरी मधील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्ण न झाल्याने नर्सरीचे वर्ग सुरु करण्यात आले नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महापालिका शाळांची पटसंख्या वाढत आहे.त्यामुळे महापालिका द्वारे राज्यात पहिली सीबीएसई शाळा सुरु करण्यात आली. यंदा डिसेंबर मध्ये नर्सरी प्रवेश करिता १२० जागांसाठी १४५६ अर्ज दाखल झाले आहेत. एप्रिल २०२४ पर्यंत सीबीएसई शाळेची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शाळा सुरु होते. मात्र, यावर्षी जून महिन्याचा शेवटचा आठवडा उलटला तरी देखील सीबीएसई शाळेची प्रवेश प्रकिया पूर्ण न झाल्याने नर्सरी वर्ग सुरू करण्यात आले नाहीत.
दुसरीकडे प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरु असून, पालक वर्गाकडून कागदपत्रांची पुरेपूर पूर्तता होत नाही. त्यामुळे नर्सरी प्रवेश प्रकिया लांबल्याने वर्ग सुरु झाले नाहीत, अशी माहिती महापालिका शिक्षण विभाग द्वारे देण्यात आली.
महापालिका महासभेच्या मान्यतेने नवी मुंबई महापालिका मार्फत नेरुळ सेवटर-५० मधील महापालिका शाळा क्रमांक-९३, कोपरखैरणे सेक्टर-११ मधील महापालिका शाळा क्रमांक-९४ आणि सारसोळे मधील महापालिका शाळा क्रमांक-९८ या ठिकाणी सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते इयत्ता ७वी मधील वर्गातील रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिका सीबीएससी शाळा मधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. अर्जांच्या कागदपत्रांची पडताळणा प्रक्रिया पूर्ण होताच नर्सरी वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. - अरुणा यादव, शिक्षणाधिकारी - नवी मुंबई महापालिका.