वटपौर्णिमा निमित्त वड रोपांची लागवड

नवी मुंबई : वटपौर्णिमेचा सण आपल्या सौभाग्याला उदंड आयुष्य लाभावे म्हणून सौभाग्यवतींकडून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त वडाची पूजा करुन निसर्गाशी जवळीक साधली जाते. मात्र, आजच्या इन्स्टन्ट आधुनिक युगात घरातल्या घरात वटपूजा करण्यासाठी वडाच्या फांद्यांची काही प्रमाणात तोड होताना दिसते. त्यामुळे वटपूजा करण्यासाठी होणारी वृक्षहानी टाळावी आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश प्रसारित व्हावा याकरिता वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करुन ‘झाडे लावा, झाडे जगवा' असा संदेश प्रसारित करण्यासाठी १८ वड रोपांची लागवड केली.

बेलापूर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या आवारात महापालिका सचिव चित्रा बाविस्कर आणि सहा आयुक्त (उद्यान विभाग) ऋतुजा गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ५० पेक्षा अधिक महापालिका महिला कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्साहाने वृक्षारोपण केले. यावेळी आयुर्वेदात अत्यंत महत्वाचा वृक्ष असलेल्या वटवृक्षाच्या एकूण १८ रोपांची लागवड करण्यात आली.

वटपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षांचे महत्व अधोरेखीत करणारा नवी मुंबई महापालिका महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन राबविलेला अभिनव उपक्रम परंपरा जपत आधुनिकतेशी सांगड घालणाऱ्या स्त्री शक्तीची सर्वसमावेशकता प्रदर्शित करणारा आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या महापालिका महिला कर्मचाऱ्यांच्या पर्यावरण प्रेमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ब्रेल लिपीतील चार पुस्तकांचे स्नेहज्योती अंधशाळेमध्ये प्रकाशन