वाशी रुग्णालय मध्ये ‘आयुष्यमान भारत डिजीटल मिशन'चे कामकाज समाधानकारक

नवी मुंबई : ‘आयुष्यमान भारत डिजीटल मिशन'च्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता ‘राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती गौर मुखर्जी आणि संचालक विक्रम पगारीया यांनी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक सार्वजनिक रुग्णालयास भेट दिली. यावेळी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश म्हात्रे उपस्थित होते.

सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे ‘आयुष्यमान भारत डिजीटल मिशन' अंतर्गत ‘आभा ॲप'द्वारे रुग्णांची आभा नोंदणी करणे, त्यांचे टोकन नंबर तयार करणे आणि त्याद्वारे आभा नोंदणी कक्षातून त्वरित केसपेपर मिळविणे अशा कामांबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी महापालिका मार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन, आदि विविध उपक्रमांची सविस्तर माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थितांना दिली. तसेच नजिकच्या काळात रुग्णालयविषयक सर्व कामकाजाचे संगणकीकरण करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.  

‘आभा ॲप'द्वारे नोंदणीकरण झालेल्या रुग्णांना लांबलचक रांगा टाळून त्वरित केसपेपर मिळत असल्यामुळे रुग्णांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच आभा नंबर युनिक असल्यामुळे संपूर्ण देशात ‘आभा ॲप'चा वापर होत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची सर्व माहिती (यापूर्वीचा आजार, त्यावर झालेला उपचार, तपासण्या, औषधे) रुग्णाच्या सहमतीने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रुग्णांना चांगल्या आणि दर्जेदार रुग्णसेवा कमी कालावधीत देता येणे शक्य होणार आहे.

दरम्यान, सदर भेटी दरम्यान कोपरखैरणे येथे जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्तरित्या बंद करून तेथे बनविण्यात आलेल्या निसर्गेद्यानाला, तेथील मियावाकी जंगल परिसराला तसेच त्या जवळील टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालयाचीही पाहणी दिप्ती गौर मुखर्जी यांनी केली. यावेळी त्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या पर्यावरणशील नाविन्यपूर्ण कामांची प्रशंसा केली.

‘आभा ॲप'चा वापर होत असलेल्या खाजगी रुग्णालये, प्रयोगशाळा येथे देखील रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ‘राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती गौर मुखर्जी यांनी सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे ‘आयुष्यमान भारत डिजीटल मिशन'च्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन सदरचे कामकाज प्रभावीपणे होत असल्याचे नमूद केले. तसेच या योजनेचे पुढील टप्प्यातील कामकाज करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन करतानाच ‘राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण'मार्फत ‘नमुंमपा'ला याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. 

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

Read Next

साथरोग-किटकजन्य आजार टाळण्यासाठी काळजी घेण्याचे पनवेलकरांना आवाहन