‘सेव्ह पेंढारकर कॉलेज' मोहीम

कल्याण : पेंढारकर कॉलेज प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात ‘पेंढारकर कॉलेज बचाव समिती'च्या माध्यमातून पेंढारकर कॉलेज डोंबिवली जे मूळ अनुदानित आहे, ते विनानुदानित करण्याचा कॉलेज प्रशासनाकडून घाट घालण्यात आला आहे. या विरोधात ‘पेंढारकर कॉलेज बचाव समिती'तर्फे साखळी उपोषण आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या आठव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न होत कॉलेज प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

के. व्ही. पेंढारकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच जुनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ‘सेव्ह पेंढारकर कॉलेज' असा नारा देत गेल्या ८ दिवसांपासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थीनी साखळी उपोषण सुरु केले आहे.

कॉलेज अनुदानित आहे, ते विनाअनुदानित करण्याचा घाट घातला गेला आहे. त्याला सरकारची मान्यता नाही, मान्यता नसताना तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विनाअनुदानित प्रक्रिया राबविणे सुरु आहे. अनुदानित ज्युनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसविण्याचा प्रकार अन्यायकारक आहे. यामुळे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक भरडले जाणार आहेत. कॉलेज विनाअनुदानित झाल्यावर शैक्षणिक फीमध्ये सवलत असलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल. त्याचा भुर्दंड पालकांना बसेल. त्यामुळे कॉलेजच्या मनमानीविरोधात साखळी उपोषण सुरु करण्यात आल्याचे आंदोलनात सहभाग घ्ोतलेल्या शिक्षकांनी सांगितले.

आज अर्धनग्न होण्याची वेळ कॉलेज प्रशासनाने आमच्यावर आणली आहे. २०१२ पासून डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ विरुध्द शेकडो पुरावे दिले गेले, शेकडो समित्या नेमल्या गेल्या, शेकडो आदेश दिले गेले. तरी देखील ‘डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ'वर असलेल्या वरदहस्तामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसून त्याविरोधात उपोषणाला बसलो आहोत. ‘पेंढारकर कॉलेज'चे खाजगीकरण झाल्यास या धर्तीवर महाराष्ट्रातील इतर सर्व अनुदानित कॉलेज विनाअनुदानित होतील. शिक्षण विभाग, कुलगुरु, प्रकुलगुरु यांच्या डोळ्यांवरील पट्टी आमची अर्धनग्न अवस्था बघून तरी उघडेल का? शेकडो पुरावे देऊन देखील कारवाई होत नसल्याने अर्धनग्न आंदोलन केले असल्याची माहिती ‘पेंढारकर कॉलेज बचाव समिती'चे संयोजक माजी विद्यार्थी सोनू सुरवसे यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 उरण-मुंबई रेल्वे प्रवास स्वस्त; पार्किंग महाग