महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
एपीएमसी आवारात पाण्याविना बाजार घटकांचे हाल?
वाशी : नवी मुंबई महापालिकेने वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील अतिधोकादायक घोषित केलेल्या कांदा-बटाटा मार्केट मधील नळ जोडणी खंडीत केल्याने पाण्याविना या मार्केट मधील व्यापारी, ग्राहक, कामगार आणि मालवाहतूकदारांचे प्रचंड हाल होत असून, त्यांना पाणी टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारात रोज शेकडो वाहने शेतमाल घेऊन येतात तर हजारो ग्राहक खरेदीसाठी येतात.मात्र, मागील काही वर्षांपासून एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील सर्व इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या असून, अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा नवी मुंबई महापालिकेने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण एपीएमसी कांदा-बटाटा आवार, मॅफको मार्केट आणि मसाला मार्केट मधील मध्यवर्ती सुविधा केंद्र या अतिधोकादायक घोषित केलेल्या सर्व इमारतींची नळ जोडणी नवी मुंबई महापालिकेने १९ जून रोजी खंडीत केली. एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात रोज १०० पेक्षा अधिक वाहने शेतमाल घेऊन येतात. तसेच एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील २५० पेक्षा जास्त गाळ्यांमध्ये व्यापारी, ग्राहक, कामगार आदींची वर्दळ असते. त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील पाणी खंडीत केल्याने या बाजारातील घटकांना पाण्यासाठी टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे. मात्र, एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात टँकर द्वारे होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने पाण्याविना बाजार घटकांचे प्रचंड हाल होत आहेत.
याबाबत एपीएमसी सचिव पी. एल. खंडागळे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.
दरम्यान, एपीएमसी प्रशासन बाजार आवारातून विविध कर वसूल करते. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने एपीएमसी आवारातील बाजार घटकांसाठी पाणी व्यवस्था करावी, अशी मागणी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील व्यापारी मनोहर तोतलानी यांनी केली आहे.