पनवेल मध्ये  आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा;

पनवेल : पनवेल महापालिका तर्फे पनवेल शहरातील वडाळे तलावाजवळ भव्य स्वरुपात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने ‘पतंजली योग समिती'चे भारतीय नौसेना मधील निवृत्त लेपटनंट राम पलट यादव यांनी यावेळी उपस्थितांना योगासने आणि प्राणायम, ध्यान याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यानी सहभागी होत योगासने केली. या योग दिन कार्यक्रमाला पावसाळी वातावरण असून देखील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात ‘पंतजली योग समिती'चे सदस्य राम पलट यादव यांनी अर्ध चक्रासन, ताडासन, वक्रासन, भुजंगासन, पवन मुक्तासन, अर्ध हलासन आदी आसनांचे विविध प्रकार शिकवून त्यांचे फायदे सांगितले. तसेच प्राणायमामध्ये कपालभाती, भ्रामरी, अनुलोम विलोम याबद्दल मार्गदर्शन केले. याबरोबरच ध्यानामुळे शरीराला होणाऱ्या लाभाबद्दल राम पलट यादव यांनी सविस्तर माहिती दिली.

योग दिन कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, संदीप पाटील, विकास घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महापालिका अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, घनकचरा-स्वच्छता विभागप्रमुख अनिल कोकरे, ‘भारत स्वाभिमान ट्रस्ट'चे रायगड जिल्हाप्रमुख रामबाबू मोरे, सह जिल्हा प्रभारी राजेंद्र सिंह, ‘पतंजली योग समिती'चे रायगड जिल्हा प्रभारी रविंद्र मोरे, योग संदेश प्रभारी अल्का अव्हाड, ‘पतंजली योग समिती'च्या महामंत्री सरिता ठाकूर, ‘पनवेल बम्हकुमारीज'च्या इनचार्ज ताराबेन, डॉ. शुभदा नील, सपना पाटील, आर.पी. यादव,  डॉक्टर समुद्रे, श्वेता शेट्टी, ‘भारतीय जनता युवा मोर्चा'चे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, अक्षय सिंग, वरुण डांगर, शुभम कांबळे यांच्यासह महापालिका अधिकारी-कर्मचारी, विविध सामाजिक संस्था सदस्य आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता.  

दरम्यान, योग दिनाचे औचित्य साधून स्वच्छ, सुंदर आणि सदृढ पनवेल बनविण्याच्या दृष्टीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत घनकचरा आणि आरोग्य विभाग, माझी वसुंधरा अंतर्गत गारबेज टू गार्डन, झिरो वेस्ट, गांडूळ खत, कंपोस्टींग, ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण अशा विविध प्रकारची माहिती देणारे स्टॉल योग दिन कार्यक्रमात मांडण्यात आले होते. या स्टॉलला भेट देऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका करत असलेल्या कामाची माहिती घेतली. यावेळी भारत विकास परिषद तर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये योगाला प्रचंड महत्व होते. योगामुळे शरीर, मन दोन्हीही सुदृढ बनते. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून या दिवशी दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. त्यानंतर या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर २०१४ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन'ला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली. २१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिवस' जगभर साजरा करण्यात आला. केवळ भारत देशातच नाही तर साऱ्या जगाला आता योगाचे महत्व पटले आहे. त्या अनुषंगाने २१ जून या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा केला जातो, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वटपौर्णिमानिमित्त वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा