एपीएमसी आवारातील धोकादायक इमारतींची नळ जोडणी खंडीत

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील संपूर्ण कांदा-बटाटा आवार, मॅफको मार्केट आणि मसाला मार्केट मधील मध्यवर्ती सुविधा केंद्र या इमारती नवी मुंबई महापालिकेने अतिधोकादायक घोषित करुन सदर इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र, नोटीस बजावून देखील सदर इमारतींचा वापर सुरु ठेवण्यात आल्याने महापालिकेने अखेर या इमारतींची नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई केली.

मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेने वाशी मधील एपीएमसी कांदा-बटाटा आवारातील इमारती, मॅफको मार्केट आणि मध्यवर्ती सुविधा केंद्र इमारत या इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. तर पावसाळ्यात या इमारतींचे स्लॅब, प्लास्टर कोसळल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अलिकडेच १७ जून रोजी एपीएमसी प्रशासकीय इमारतीतील सचिव पी. एल. खंडागळे यांच्या  दालनात खुर्चीवर स्लॅब कोसळला होता. मागील वर्षी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील लिलावगृहाची कमानी तसेच  काही गाळ्यातील सज्जा भाग कोसळले होते. गेली अनेक वर्षांपासून एपीएमसी मार्केटमधील धोकादायक इमारतीतील गाळेधारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, महापालिकेने नोटीस पाठवूनही एपीएमसी मार्केटमधील धोकादायक इमारतीत  व्यावसायिक व्यापार सुरुच होता. परंतु, १७ जून रोजी एपीएमसी कांदा-बटाटा बाजार मार्केट मधील प्रशासकीय इमारतीतील खुद्द एपीएमसी सचिव पी. एल. खंडागळे यांच्या दालनातील छताचा भाग कोसळल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, १९ जून रोजी महापालिकेने एपीएमसी मार्केट मधील धोकादायक इमारतीतील नळ जोडणी खंडीत केली आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजार, प्रशासकीय इमारत, मॅफको मार्केट आणि मसाला बाजार येथील नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे.  अतिधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ॲक्शन घेतली आहे. नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग कार्यालयाद्वारे सदर नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या असून, सदर इमारती खाली करण्यासाठी नोटीस दिल्या आहेत.मात्र, नोटीस बजावूनही अतिधोकादायक इमारतींचा वापर सुरु आहे. त्यामुळे पावसात या अतिधोकादायक इमारती कोसळून कुठलीही मनुष्यहानी होऊ नये म्हणून नवी मुंबई महापालिका तर्फे १९ जून रोजी रात्री धोकादायक इमारतींची नळ जोडणी खंडीत केली आहे. याआधीही एपीएमसी आवारातील जुन्या इमारतींचे संरचना परीक्षण करण्याच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. - भरत धांडे,  तुर्भे विभाग अधिकारी - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल मध्ये  आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा;