दिवसा घरफोडी करणा-या सराईत चोरटयाला 24 तासात अटक

आरोपीकडुन 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश

नवी मुंबई : रबाळे परिसरात दिवसा घरफोडी करणाऱया एका साराईत चोरटयाला रबाळे पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे. नुरआलम जियाउल शेख उर्फ नूर आलम पंजाब शेख (25) असे या चोरटयाचे नाव असुन पोलिसांनी त्याच्याकडुन सोने-चांदीचे दागीने व देवी देवतांच्या लहान मुर्त्या असा सुमारे 8 लाख रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. या चोरटयाने रबाळेच्या हद्दीत केलेले 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी या चोरटयाच्या फरार साथीदाराचा शोध सुरु केला आहे.  

गत 17 जून रोजी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयाने रबाळेतील गोठीवली गावातील हरीपार्क सोसायटीतील बंद असलेले गौरव कापडणीस, रुपेश पंडीत व महादेव उकार्डे यांच्या घराचे कडीकोयंडे उचकटुन तीन्ही घरामधून 2 लाख 68 हजार 250 किंमतीचे 60 ग्रॅम 750 मिली ग्रॅम वजनाचे सोने, 30 ग्रॅम चांदी व देवघरातील पितळेच्या देवाच्या मुर्त्या व रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात, पोलीस उपनिरीक्षक दयानंद वणवे, पोलीस हवालदार निलेश भोसले, दर्शन कटके, प्रसाद वायंगणकर व त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली.  

या तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीच्या आधारे या घटनेतील चोरी करणारा आरोपी नुरआलम जियाउल शेख हा रेकॉर्ड वरील सराईत आरोपी असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रीक विष्लेषणाच्या आधारे आरोपीचा कोपरखैरणे परिसरात शोध घेत असताना, सेक्टर 19 परीसरातुन तो पश्चिम बंगाल येथे मुळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे गोठीवली गावातील घरफोडीच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडुन चोरीच्या गुह्यातील मुद्देमाल हस्तगत करुन त्याला अटक केली आहे.  

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी नुरआलम जियाउल शेख याच्या विरोधात मुंबईतील बोरीवली, बांद्रा तसेच विष्णुनगर पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असून विष्णु नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुह्यात कल्याण न्यायालयाने आरोपोला 4 महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 अंमली पदार्थ विक्रेत्यांचे मोडले कंबरडे