‘बेलापूर'ला सौरऊर्जेची झळाळी; बाजारपेठा, मुख्य चौक प्रकाशमान

नवी मंबई :  सौरऊर्जेचा प्रभावी वापर करुन नवी मुंबई विशेषतः बेलापूर विधानसभा मतदरासंघ प्रकाशन करण्याचा निर्धार आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केला आहे. आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या राज्य आणि केंद्र शासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जवळपास २५ कोटी रुपये खर्चातून सानपाडा, बेलापूर, वाशी, सीवुडस्‌, नेरुळ, जुईनगर, आदि नोडमध्ये हायमास्ट दिवे उभारण्यात आले आहेत. यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या पददिव्यांवरील लाखो रुपयांच्या वीज देयकांची बचत होऊन या सर्व नोडमधील मुख्य चौक, बाजारपेठा प्रकाशमान झाल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून बेलापूर विधानसभा मतदारसंघात वाशी ते बेलापूरपर्यंत सर्वच नोड मधील सर्व शाळा-महाविद्यालयांसमोरील रस्ते, मुख्य चौक, बाजारपेठा, मैदाने, उद्याने, वाणिज्य संकुल, रहिवासी सोसायट्या, आदि महत्वाच्या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत.

शहरात लावण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम नवी मुंबई महापालिका करणार आहे. बेलापूर विभागातील प्रभाग क्र.८८ ते ९२, १०१ ते १११ मध्ये ३४ सोलर हायमास्ट उभारण्यात आले आहेत. वाशी मधील प्रभाग क्र.६० ते ६५ आणि नेरुळ विभागातील ज्वेल ऑफ नवी मुंबई, आर.आर.पाटील उद्यान आणि वंडर्स पार्क येथे ३४ यासह इतर ठिकाणी असे एकूण ६६२ सोलर हायमास्ट बसविण्यात आले आहेत. तर उर्वरित ठिकाणी ४.६४ कोटी रुपयांचे सोलर हायमास्ट बसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.  


नवी मुंबई शहरात सौरऊर्जेवर चालणारे हायमास्ट बसविण्यासाठी गेले अनेक महिने माझा पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे ‘महायुती शासन'तर्फे २५ कोटी रुपयांचे विशेष अनुदान सोलर हायमास्टसाठी मिळवता आले. त्यामुळे नवी मुंबईला सौरऊर्जेची झळाली मिळाली आहे. यामुळे चोरी, महिलांची छेडखानी यासह इतर गुन्हेगारी घटनांना चाप बसण्यास मदत होणार आहे.
-आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात