‘योग मंत्रा'द्वारे नमुंमपा मार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

नवी मुंबई : ‘स्वतःसाठी आणी समाजासाठी योग' या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा होत असताना नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह नमुंमपा अधिकारी-कर्मचारी यांनी सिडको एक्झिबिशन सेंटर येथे संपन्न झालेल्या ‘योग मंत्रा' या विशेष कार्यक्रमात सहभागी होत योग दिन उत्साहात साजरा केला. याप्रसंगी आमदार गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, माजी महापालिका आयुक्त विजय नाहटा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

योगाभ्यासाचा नियमित अंगिकार केल्यामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येतात. त्यामुळे ‘योग'चे महत्व ओळखून योगाभ्यास जनजागृतीसाठी दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘जागतिक योग दिन' साजरा केला जातो.

नवी मुंबई महापालिका सातत्याने योगविषयक विविध उपक्रमांचे शालेय आणि खुल्या पातळीवर आयोजन करीत असते. अशाच प्रकारे सिडको एक्झिबिशन सेंटर येथील ‘योग मंत्रा'मध्ये योगाभ्यासाचे महत्व जनमानसात प्रसारित होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने सहभागी होत या उपक्रमाच्या यशस्वीतेत योगदान दिले. या माध्यमातून ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'बाबत स्वच्छता संदेशाचाही प्रसार करण्यात आला.

याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शिरीष आरदवाड तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांनी योगप्रकार करीत आत्मिक शांती आणि समाधानाचा लाभ घेतला.

आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगसाधना अत्यंत महत्वाची आहे. ‘आंतरराष्ट्रीय योग दिन'निमित्त प्रत्येकाने यापुढील काळात नियमित योग करण्याचा संकल्प करावा.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी