पहिल्याच पावसात एपीएमसी बाजार आवारातील नालेसफाईची पोलखोल
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) प्रशासन तर्फे एपीएमसी बाजार आवारात नालेसफाई केली जाते. मात्र, १९ जून रोजी पडलेल्या पहिल्याच पावसामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात पाणी भरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पहिल्याच पावसाने एपीएमसी प्रशासनाने केलेल्या नालेसफाई कामाची पोलखोल केली आहे.
एपीएमसी प्रशासनाद्वारे एपीएमसी बाजार आवारातील नालेसफाई करण्याच्या कामासाठी ठेका दिला जातो. त्यात महिने नाले देखभाल देखील समाविष्ठ असते. मात्र, ठेकेदारामार्फत एपीएमसी बाजार आवारातील मान्सूनपूर्व नालेसफाई करताना फक्त झाकणे काढून गाळ काढण्याचे सोपस्कार पार पाडले जाते. त्यामुळे गटाराच्या आतील गाळ योग्यरीत्या साफ न केल्याने एपीएमसी बाजार आवारात पहिल्याच पावसात पाणी भरुन नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली आहे. नवी मुंबई मध्ये १९ जून रात्री पासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, एपीएमसी बाजार आवारात योग्यरित्या नालेसफाई न केल्याने एपीएमसी कांदा-बटाटा आवारात पाण्याचा निचरा होण्यास अडचणी आल्याने एपीएमसी बाजार आवारात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा-बटाटा पावसात भिजला. त्यामुळे कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
दरम्यान, एपीएमसी प्रशासनाद्वारे करण्यात येणार एपीएमसी बाजार आवारातील नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई केवळ कागदावरच केली जात असल्याने दरवर्षी पहिल्याच पावसात एपीएमसी बाजार आवारात पाणी साचत आहे, असे कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले.