नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी
डोंबिवली : दिवा प्रभागात नालेसफाईची कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत. पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरुन घरातील सामानांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ‘दिवा प्रभाग समिती'चे सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरुन त्यांना निलंबित करावे, अशी मागणी ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गट'चे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त कमी पडत असून दिवा विभागाचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाळ्याआधी करणे अपेक्षित होते. अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही. नाल्यावर असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या आहेत. नाले पूर्ण क्षमतेने साफ न केले गेल्याने गणेशनगर, विकास म्हात्रे गेट, बेडेकर नगर, डी. जी. कॉम्प्लेक्स येथे पावसाचे पाणी साठून ते नागरिकांच्या घरात घुसले आहे. दरवर्षी सदर प्रकार पावसाळ्यात दिव्यात पहायला मिळतो.
मागील घटनांवरुन ‘दिवा प्रभाग समिती'चे सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका ‘शिवसेना'चे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे. दिवा विभागात महापालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पाडणार नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांना शिस्त लागेल आणि दिवा विभागाकडे बघण्याचा अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन बदलेल, असेही रोहिदास मुंडे यांनी म्हटल आहे.
दिवा विभागात जो गलिच्छपणा आणि अस्वच्छता अनेक ठिकाणी पहायला मिळते, त्याबाबत सुध्दा सहायक आयुक्तांनी भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र, ‘ठाणे'ला एक न्याय आणि दिवा विभागाला एक न्याय अशा पध्दतीचे प्रशासन येथे काम करणार असेल तर अशा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.