पावसाळ्यातील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज - व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा
नवी मुंबई : पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने कोकण रेल्वेने पायाभूत सुविधांची देखभाल दुरुस्ती, वाढीव गस्त आणि आपत्कालीन तयारी यावर लक्ष केंद्रित करुन पावसाळ्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल हवामानात कोकण रेल्वे मार्गावरील गाडयाचे संचलन सुरळीत सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पावसाळी हंगाम हाताळण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोकण रेल्वे मार्गावरील ड्रेनेज आणि पायाभूत सुविधांची देखभाल, कॅच वॉटर ड्रेनची सखोल स्वच्छता, तसेच रेल्वे कटिंग्जची तपशीलवार तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचे सुरक्षित संचालन करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या दशकात पावसाळ्यामध्ये दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे सेवा विस्कळीत झाली नसल्याचे झा यांनी सांगितले.
या पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालण्यासाठी 672 जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच चोवीस तास गस्त, गाडयाच्या वेगावर निर्बंध ठेवणे, आपत्कालीन काळात जलद प्रतिसादासाठी रेल्वे मेंटेनन्स व्हेईकल (आरएमव्ही) तैनात ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 9 रेल्वे स्थानकावर टॉवर वॅगन्स उभ्या ठेवण्यात आल्या असून त्वरित आपत्कालीन प्रतिसादासाठी कारवार आणि उडुपी येथे यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थीतीत नियंत्रण कक्ष व रेल्वे स्टेशनवर संपर्कासाठी लोको पायलट आणि गार्डसना मोबाइल फोनसह वॉकी-टॉकी सेट प्रदान करण्यात आल्याचे झा यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे पावसाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी आणि अधिका-यांना सतर्क करण्यासाठी नऊ स्थानकांवर स्वयं-रेकॉर्डिंग पर्जन्यमापक स्थापित करण्यात आले आहे. काळी नदी, सावित्री नदी, आणि वाशिष्ठी नदी या तीन पुलांवर पूर सतर्क यंत्रणा बसवण्यात आली आहे. बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष संपूर्ण पावसाळ्यात गाडयाचे संचालन सुनिश्चित करण्यासाठी 24 तास कार्यरत ठेवण्यात आले असून 6 स्थानकांवर वैद्यकीय पथके देखील सज्ज ठेवण्यात आल्याचे संतोष कुमार झा यांनी सांगितले.