नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल -कुलगुरु डॉ.रवींद्र कुलकर्णी

नवी मुंबई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बहुविद्याशाखीय असून या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी सर्जनशील, व्यवसायाभिमुख आणि प्रशिक्षित होणार आहे. त्यामुळे सदर शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘मुंबई विद्यापीठ'चे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी वाशी येथे केले. 

मुंबई विद्यापीठ आणि कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १८ आणि १९ जून रोजी वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० यासंबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्‌घाटन ‘मुंबई विद्यापीठ'चे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केबीपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक, विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता आणि प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० यासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल ठरणार असून विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासही मदत होणार असल्याचे स्पष्ट केले.

सदर दोन दिवसीय कार्यशाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रवेश प्रकिया याविषयी डॉ. रवींद्र बाबर्डेकर यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. देवेश शहा यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासंबंधी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. डॉ. हिरेन दंड यांनी ॲकेडिमेक क्रेडीट बँक याविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. शिवराम गर्जे यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि पालक यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजावून सांगितले.

सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक आणि स्वागत केबीपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ‘मुंबई विद्यापीठ'मधील प्रा. सुहास जेजुरकर, केबीपी कॉलेजचे प्रा. सारंग भागवत यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

या कार्यशाळेत शिक्षक, विद्यार्थी, पालक, उद्योजक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 शिक्षण संस्थामध्ये केले शैक्षणिक वस्तूंचे वाटप