‘कर्नाळा किल्ला'वर आढळले प्राचीन तिसरे भुयार

नवीन पनवेल : रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील प्रसिध्द कर्नाळा किल्ला आहे. ‘कर्नाळा किल्ला'च्या माथ्यावर, बालेकिल्यावर असलेला सुळका या किल्ल्याचे वैशिष्ट्य असून मुंबई-गोवा महामार्गावरुन तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो. कर्नाळा पक्षी अभयारण्यामुळे ‘कर्नाळा किल्ला'च्या परिसरातील जंगल वन विभाग अंतर्गत संरक्षित केले गेले आहे. वन विभागाने पक्षी अभयारण्य आणि पर्यटकांसाठी सोयी-सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करुन दिल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.

दरम्यान, ‘कर्नाळा किल्ला' येथे नव्याने तिसरे भुयार (गुंफा) १६ जून २०२४ रोजी निदर्शनास आले. सदर भुयार ८० % मातीने बुजलेले असून याचे तोंड २.५ फुट लांब आणि १.५ फुट रुंद असून आतमध्ये साधारण १० फुट एवढे आहे.

मातीचा गाळ काढल्यावर भुयाराचा मूळ आकार स्पष्ट होईल. सध्या या भुयारासमोर मोठे गवत आणि झडपे असून सदर भुयारे ‘कर्नाळा किल्ला'च्या प्राचीन कालखंडातील दुर्ग अवशेषांच्या अस्तिवाच्या खुणा आहेत. यावरुन कर्नाळा किल्ला'ची निर्मिती प्राचीन कालखंडात झालेली आढळते. तसेच लवकरच किल्ल्याच्या परिसरातील, घेऱ्यातील पुरावषेशांची माहिती मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे शिरढोण गांवच्या गणेश रघुवीर आणि मयुर टकले यांनी सांगितले.

‘कर्नाळा किल्ला'च्या भौगोलिक आणि लष्करीदृष्ट्या संरक्षणाच्या उद्देशाने विविध कालखंडात किल्ल्यावर बांधकामे आणि त्याची डागडुजी झाली असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील स्थापत्य शास्त्राच्या खुणा आजही निदर्शनास येतात. डोंगराचे कडे तासून त्यावर केलेले बांधकाम, खडकात खोदलेल्या मोठ्या प्रमाणातील टाके, कोठारे, वाड्याची इमारत, घरांची जोती, चौकी मेट, शरभ शिल्प, अशा वास्तुंचे अवशेष आजही आहेत. शिलालेख ‘कर्नाळा किल्ला'वरील बांधकाम आणि त्या काळातील राजवट याबद्दलची माहिती देते. त्यामुळे ‘कर्नाळा किल्ला'चे महत्व विविध कालखंडात फार महत्व होते, असे निदर्शनास येते. ‘कर्नाळा किल्ला'ची ऐतिहसिक पार्श्वभूमी पाहता सातवाहन, पोर्तुगीज, गुजरात सुलतान, देवगिरी यादव, आदिलशहा, निजामशहा, मराठे आणि इंग्रज या राजवटी इथे होऊन गेलेल्या आहेत. त्यानंतर आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव देखील ‘कर्नाळा किल्ला'ला लाभले आहे.

शिरढोण गांवचे रहिवासी असलेले गणेश रघुवीर आणि मयुर टकले (सदस्य-सह्याद्री प्रतिष्ठान, पनवेल) यांना संपर्क साधून कर्नाळा किल्ल्याला सन २०२२ मध्ये केलेल्या वन विभाग सोबत पाहणी नंतर मी त्यांना अहवाल सादर केला होता. त्या संदर्भात किल्ल्यावर झालेल्या कामांची पाहणी करण्याचे आमचे ठरले. वन विभागाने सन २०२३ मध्ये निसरड्या वाटांवर पायऱ्या बांधल्या आणि संरक्षित कठडे (रेलिंग) उभारले आहेत. या झालेला गोष्टी पाहून आनंद झाला. तसेच २५ नोव्हेंबर २०१९ मध्ये सह्याद्री प्रतिष्ठान आणि स्थानिक शिरढोण ग्रामस्थ यांच्या पुढाकाराणे संस्थेने लोकवर्गणीतून सागवानी प्रवेशद्वार देखील बसविले आहे. तसेच स्थानिक निलेश भोपी ‘कर्नाळा किल्ला'च्या जतन, संवर्धन आणि रेस्वयुसाठी कित्येक वर्षापासून निस्वार्थ कार्य करीत आहेत. त्यांचे कार्य आणि तळमळ पाहून एक ऊर्जा मिळते.

‘कर्नाळा किल्ला'च्या घेऱ्यात असलेल्या पायथ्याजवळील कल्हे गावातून अर्धा तास उंचीवरील कड्यात एक कोरीव भुयार आहे. तर किल्यावर एल आकारची दोन कोरीव भुयारे आहेत. त्यांना स्थानिक मंडळी पाण्याची टाके असे म्हणतात. यातील भुयार क्रमांक-१ पहिल्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला एक पायवाट जाते, त्याने २ मिनिटे चालत गेले असता कातळात खोदलेले कोरीव भुयार दिसते. ते एल आकाराचे आहे. याचे तोंड ३ X ३ फुट असून ६ फुट खोल आणि तळाशी ३ X ३ आकारचे तोंड असून ते १० फुट लांबीचे कोरलेले आहे.

भुयार क्रमांक-२ ‘कर्नाळा किल्ला'वरील कर्णाई देवी मंदिरासमोर पत्राच्या शेडच्या उजव्या बाजुला एक मोठा घराच्या जोत्याचा चौथरा आहे. त्यावरुन डाव्या बाजुने कडेकडेने गेले असता तेथे कातळात खोदलेले एक भुयार आहे. स्थानिक लोक त्याला पाण्याची टाकी संबोधतात. पण, ती पाण्याची टाकी नसून ते एल आकाराचे भुयार आहे. त्याचे तोंड २.५ X २.५  फुट आकाराचे चौकोनी भाग असून ते साधारण ६.३ फुट खोल असून त्याच्या तळाशी २ X २ फुट आकाराचा चौकोनी भाग कोरला असून आत ८ ते १० फुट लांब एवढा कोरीव भाग आहे.

भुयार क्रमांक-३ (नव्याने आढळेले भुयार/गुंफा) ‘कर्नाळा किल्ला' येथे नव्याने तिसरे भुयार (गुंफा) १६ जून २०२४ रोजी निदर्शनास आले. भुयार क्रमांक-२ च्या पुढे ८० फुटावर कातळाच्या कडेला आणखी एक कोरीव भुयार आहे. सदर भुयार ८०  % मातीने बुजलेले असून याचे तोंड २.५ फुट लांब आणि १.५ फुट रुंद असून आतमध्ये साधारण १० फुट एवढे आहे. यातील मातीचा गाळ काढल्यावर याचा मूळ आकार निदर्शनास येईल. सदर भुयारासमोर मोठे गवत आणि झडपे आहेत. या वास्तुचे अक्षांश-रेखांश आणि जीपीएस लोकेशन नोंद करण्यात आले आहे.

सदर भुयारे ‘कर्नाळा किल्ला'च्या प्राचीन कालखंडातील दुर्ग अवशेषांच्या अस्तिवाच्या खुणा आहेत. यावरुन ‘कर्नाळा किल्ला'ची निर्मिती प्राचीन कालखंडात झालेली आढळते. तसेच लवकरच किल्ल्याच्या परिसरातील, घेऱ्यातील पुरावषेशांची माहिती मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. - गणेश रघुवीर, मयुर टकले - रहिवासी, शिरढोण गांव.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल मधील विकास कामांचा आयुक्तांकडून आढावा