पाणी प्रश्नावर करंजाडेवासियांचे आंदोलन

नवीन पनवेल : करंजाडे नोड मधील पाणी प्रश्नावरुन १८ जून रोजी करंजाडेवासियांनी भर पावसात आंदोलन केले. रहिवाशांचे आंदोलन यशस्वी झाले असून करंजाडेवासियांनी केलेल्या मागण्या लवकरच पूर्ण होणार आहेत.

‘सिडको'च्या गलथान कारभारामुळे करंजाडेवासियांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही निकाली न निघाल्याने त्याच्या विरोधात ‘करंजाडे पिपल्स फाऊंडेशन'च्या वतीने मोठ्या संख्येने येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन ‘सिडको'चा निषेध केला.

सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला आणि करंजाडे येथील नागरिक १८ जून रोजी सकाळी जेएनपीटी हायवेवर रास्ता रोको करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यावेळी रहिवाशांनी धडक मोर्चा काढून ‘सिडको'च्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला. गेल्या अनेक महिन्यापासून करंजाडे परिसरात पाणी प्रश्न बिकट होत चालला असून त्यामुळे अनेक रहिवाशी आपली घरे विकून दुसरीकडे राहण्यास गेले आहेत.

‘सिडको'ने या भागाचा विकास करताना पाणी पुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे होते. परंतु, ते न करता येथे फक्त इमारती उभारल्या गेल्या असून येथील रहिवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. या सर्व गोष्टीचा येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला. तसेच ‘सिडको'ने त्वरित पाणी प्रश्न निकाली न काढल्यास पावसाळी अधिवेशनस्थळी करंजाडेवासियांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून करंजाडे वसाहतीला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. पाण्यापासून नागरिकांचे हाल सुरु आहेत. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याअनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या उपस्थितीत सिडको विरोधात १८ जून रोजी करंजाडे वसाहतीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या जेएनपीटी रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले. त्यानुसार रास्ता रोको करण्यासाठी निघालेला रहिवाशांचा मोर्चा पोलिसांनी सेक्टर ६ ते करंजाडे पोलीस चौकी या मार्गावर अडवला.

करंजाडे वसाहत ‘सिडको'ने वसवली आहे. मात्र, येथील रहिवाशांना मुलभूत सुविधा पुरवण्यात सिडको अपयशी ठरलेली दिसून येत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरु आहेत. पाणीटंचाईमुळे करंजाडेकर त्रस्त झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळाल्याशिवाय शांत बसायचे नाही, असा निर्धार नागरिकांनी केला होता. यासाठी ‘सिडको'ला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.

पुकारण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मोर्चावेळी ‘सिडको'चे कनिष्ठ अधिकारी आंदोलनकर्त्य्रांना भेटण्यासाठी आले. मात्र, वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आम्ही जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. यानंतर ‘सिडको'चे कार्यकारी अभियंता प्रणित मूल आंदोलनस्थळी आले, त्यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली.

‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'ची जीर्ण झालेली जलवाहिनी बंद करुन जेएनपीटी हायवेलगत तयार करण्यात आलेल्या नवीन जलवाहिनीद्वारे करंजाडे नोडसाठी २० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात यावा. सेक्टर- ५/६ हिलसाईड सोसायट्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी सेक्टर-६ मध्ये स्वतंत्र एमबीआर (पाण्याची टाकी) बांधण्यात यावे. शटडाऊनच्या काळात करंजाडेतील सोसायट्यांना ‘सिडको'कडून पाणीपुरवठा करण्यात यावा. करंजाडे नोडला हेटवणे धरणाचे पाणी आरक्षित करुन तेथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा.

शटडाऊन काळात आगाऊ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. करंजाडेचा पाणीप्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत नवीन इमारतींना सीसी आणि ओसीची मान्यता बंद करण्यात यावी. करंजाडे पाणी समस्येवर स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करण्यात यावी. पाणी पुरवठा अधिकारी राहुल सरोदे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, आदि मागण्यांबाबत कार्यकारी अभियंता प्रणित मूल यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे विनोद साबळे आणि रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘कर्नाळा किल्ला'वर आढळले प्राचीन तिसरे भुयार