पोलीस शिपाई होण्यासाठी उच्चशिक्षीत तरुण मैदानात  

नवी मुंबई : पोलीस शिपाई होण्यासाठी बारावी उत्तीर्ण अशी पात्रता असताना नवी मुंबई पोलीस दलातील भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील असंख्य उच्चशिक्षीत पदवीधरांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये विविध शाखेचे ग्रॅज्युएट, एलएलबी, एमए, एम.कॉम., बी.एससी, बीए, बी.फार्म झालेले असंख्य तरुण-तरुणींचा समावेश असून यात आर्मीमधून ग्रॅज्युएट झालेले काही उमेदवार देखील पोलीस शिपाई होण्यासाठी मैदानी चाचणी देताना दिसून येत आहेत.    

नवी मुंबई पोलीस दलातील १८५ पोलीस शिपाई पदांसाठी १९ जून पासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी ५,९८४ उमेदवारांचे अर्ज आले असून त्यात वकील, बी.टेक, बी.फार्म, एमबीए, आर्मी ग्रॅज्युएट अशा उच्चशिक्षित उमेदवारांचा समावेश आहे. या पोलीस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेत बी.टेक १५, बी.फार्म १०, एलएलबी २, बीपीएड २ यासह बीए, बीकॉम, बीएससी आणि इतर ग्रॅज्युएट झालेल्या २,२०४ उच्चशिक्षीत उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे आर्मीमधून ग्रॅज्युएट झालेल्या ३३ तरुणांनी देखील या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आहे. सुरक्षित भविष्याच्या उद्देशाने पोलीस शिपाई पदाच्या भरतीत सहभाग घेतल्याचे या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उच्चशिक्षीत तरुणाने सांगितले.    

 सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सरकारी नोकरी मिळणे खूपच अवघड झाले आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. त्यामुळे सदर भरतीसाठी उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. सुरक्षित नोकरी प्रापत करुन भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याची शक्यता एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली.    

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मैदानी चाचण्या कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या मैदानात घेतल्या जात आहेत. या मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी कळंबोली, सेक्टर-५ मधील शामल मोहन पाटील स्कुल या शाळेमध्ये राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुकांनी दिलीप गढरी (८३५७१०२१३५) यांच्याशी संपर्क साधणे. सदर ठिकाणावरुन परीक्षा केंद्रापर्यंत जाण्या-येण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून मोफत पोलीस वाहनाची सुविधा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळी हवामानाच्या अनुषंगाने पोलीस भरतीसाठी येणाऱ्या परीक्षार्थी उमेदवारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पाणी प्रश्नावर करंजाडेवासियांचे आंदोलन