पावसाळा कालावधीत मदतकार्यासाठी सज्ज रहा

नवी मुंबई : यावर्षी अद्यापपर्यंत पुरेशा प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नसून येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात होईल, अशी बाब लक्षात घेऊन सतर्कता राखावी. तसेच दरडप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले.

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नाले आणि गटारे सफाईच्या कामांचा आढावा घेत नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात अजुनही काही झोपड्या शिल्लक असतील तर संबधित विभाग अधिकारी यांनी पुन्हा बारकाईने प्रत्यक्ष पाहणी करावी. अशा झोपड्या आढळल्यास संभाव्य हानी टाळण्यासाठी त्या त्वरित हटवाव्यात, असे स्पष्ट निर्देशही दिले.

पाऊस लांबल्यामुळे सद्यस्थितीत नमुंमपा क्षेत्रात आठवड्यातील ३ दिवस संध्याकाळच्या वेळेत पाणी पुरवठा देता येत नाही, यामागील भूमिका नागरिकांनी समजून घेतली आहे. महापालिकेच्या मोरबे धरणात फवत ३९ दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून पुरेशा प्रमाणात पाऊस पडावा याच्या प्रतिक्षेत सर्वजण आहेत. त्यानुसार पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. याबाबतची माहिती वेळोवेळी नागरिकांना देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. शिंदे यांनी यावेळी केल्या.

पावसाळी कालावधीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवास वापर पूर्णपणे थांबविण्याची कार्यवाही करावी. आपत्कालीन निवाऱ्याच्या दृष्टीने समाजमंदिरे, विविध भवने आणि इतर अनुषांगिक जागांची उपलब्धता करण्यासह यासाठी ‘सिडको'कडे जागा उपलब्धतेबाबत पाठपुरावा करण्यात यावा. पावसाळी कालावधीत उद्‌भवणारे आजार लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने साथरोगांवरील आवश्यक औषधांची उपलब्धता करुन ठेवावी. पावसाळा लांबल्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होईल अशी नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही आयुक्त डॉ. शिंदे यांनी दिले.

परवाना विभाग तसेच नगररचना विभाग यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या परवानग्या, परवाने, प्रमाणपत्रे याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात यावी. त्याचप्रमाणे जन्म-दाखले संबधितांपर्यंत पोहाचविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सक्षम करावी. या सर्व बाबींवर तत्परतेने कार्यवाही करण्याचे आयुवत शिंदे यांच्याकडून निर्देशित करण्यात आले.

१५ जूनपासून यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून साधारणतः ६ हजार नवीन विद्यार्थी नमुंमपा शाळांमध्ये प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था असल्याबाबतचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्याचप्रमाणे शाळांमधील डिजीटल बोर्ड सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदाने अशा सेवांचाही आढावा घेण्यात आला.

बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख यांच्याकडून शासन, लोकन्यायालय आदि स्तरावरील पत्रव्यवहाराचा आढावा घेण्यात आला. पावसाळी कालावधीत सर्व घटकांनी क्षेत्रीय स्तरावर सतर्क रहावे आणि मदतकार्यासाठी सुसज्ज असावे, असे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले.

घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेने अत्यंत तत्परतेने अनधिकृत होर्डिंग निष्कासीत करण्याची कार्यवाही केली असून नोंदीत ५३ पैकी ४७ अनधिकृत होर्डिंग हटविलेले आहेत. उर्वरित ४ एमआयडीसी अखत्यारितील होर्डिंगही त्यांच्यामार्फत त्वरित हटविण्यासाठी अधिक पाठपुरावा करण्यात यावा. - डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पोलीस शिपाई होण्यासाठी उच्चशिक्षीत तरुण मैदानात