पार्किंग नियोजनासाठी ‘नमुंमपा'तर्फे ऑनलाईन सर्व्हेक्षण

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पार्किंगच्या समस्येत वाढ होऊ लागल्याने नवी मुंबई महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील बांधकाम नियमावलीमध्ये रहिवास वापराकरिता आवश्यक असलेल्या पार्किंगचे नियोजन करण्यासाठी ऑनलाईन सर्व्हेक्षण सुरु केले आहे. शहरातील पार्किंगचे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने प्रश्नावली तयार केली असून सदर ऑनलाईन सर्व्हेक्षणात नागरिकांनी माहिती भरण्याचे आवाहन महापालिकाकडून करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणातून पार्किंगबाबत मिळणाऱ्या माहितीच्या आधारे नियमावलीतील तरतुदीमध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नवी मुंबई महापालिका त्याबाबत शासनास शिफारस करणार आहे.

नवी मुंबई महापालिका बांधकाम नियमावलीतील पार्किंग नियमांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने २२ डिसेंबर २०२३ रोजी सदर ‘जनहित याचिका'ची दखल घेऊन नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्राच्या बांधकाम नियमावलीमध्ये रहिवास वापराकरिता आवश्यक असलेल्या पार्किंगच्या आवश्यकतेबाबत महापालिका आयुक्तांनी तज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदर ‘समिती'ने सर्वेक्षण आणि अभ्यास करुन त्याबाबतच्या शिफारशी महापालिका आणि शासनाला करण्याचे आदेश देखील दिले होते. उच्च न्यायालयाच्या सदर आदेशानुसार महापालिकेने तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन केली असून या ‘समिती'च्या नियमीत बैठका होत आहेत.

दरम्यान, पार्किंगबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘तज्ञ समिती'ला आपला अहवाल योग्य त्या शिफारशींसह महापालिकेला सादर करता यावा, यासाठी सदर ‘समिती'ला रहिवास वापराकरिता आवश्यक असलेल्या पार्किंगच्या अनुषंगाने योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे बांधकाम नियमावलीमध्ये रहिवास वापराच्या पार्किंगच्या आवश्यकतेबाबत नागरिकांकडून ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने प्रश्नावली तयार केली असून त्यानुसार नवी मुंबई शहरातील नागरिकांकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी https://forms.gle/vrTFN3kbfFdiLS7M9 या लिंकवर आपली माहिती भरुन सदर ‘सर्वेक्षण'मध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘नमुंमपा'तर्फे करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळा कालावधीत मदतकार्यासाठी सज्ज रहा