उरण तहसील कार्यालयातील शौचालयाची दुरवस्था

उरण : उरण तहसील कार्यालय जवळील शौचालयाची भयानक दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, तहसील कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. या शौचालयातून सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने पावसाळ्यात रोगराई पसरण्याची भिती चक्क शासकीय अधिकारी वर्ग व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सदर शौचालयाची स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत.

उरण तहसील कार्यालय आणि उरण पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शासकीय निधीतून उरण तहसील कार्यालय जवळ पुरुष आणि महिलांसाठी सुसज्ज शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे उरण तहसील, उरण पोलीस ठाणे तसेच उरण नगरपालिका यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने सध्या या शौचालयाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.

शौचालयात पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसरात दुर्गंधी सुटली असून शौचालयाचा वापर करणे कठीण झाल्याने अनेक नागरिक उघड्यावर नैसर्गिक विधी करत आहेत. यात मात्र महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नागरिकांची सदर गैरसोय टाळण्यासाठी उरण तहसील कार्यालय, पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच उरण नगरपालिका यांनी दुरवस्था झालेल्या शौचालयाच्या स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पार्किंग नियोजनासाठी ‘नमुंमपा'तर्फे ऑनलाईन सर्व्हेक्षण