अतिधोकादायक झाडे तोडण्यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख आक्रमक

कल्याण : अतिधोकादायक झालेली झाडे तोडली जात नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आक्रमक होत ‘केडीएमसी'चे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.  

सध्या पावसाचे दिवस असल्याने झाडे पडण्याची, फांद्या तुटण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून वाढलेल्या फांद्या अथवा धोकादायक झाडे तोडण्यासाठी कल्याण पश्चिम अंतर्गत प्रभाग क्र. २१, २२, २८, २९ मधील नागरिकांच्या अनेक तक्रारी उगले यांच्याकडे येत असतात. नागरिकांच्या तक्रारींनुसार मोहन उगले यांनी सदरची झाडे तोडण्यासाठी आणि फांद्या छाटण्यासाठी महापालिकेकडे वारंवार तक्रार करुन देखील अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने १८ जून रोजी मोहन उगले यांनी ‘केडीएमसी'चे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला.  

उद्यान विभागाकडे २० कोटी रुपये निधी असून देखील झाडे तोडण्यासाठी अथवा फांद्या छाटण्यासाठी केडीएमसी कारवाई करत नाही. एखादे झाड तोडण्यासाठी कामगार पाठवल्यास पुन्हा त्यांना दुसऱ्या प्रभागात पाठवले जाते. यामुळे अर्धवट फांद्या छाटून कामगार दुसरीकडे जात असल्याने पावसाळ्यात झाड पडून एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उगले यांनी ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, माजी नगरसवक मोहन उगले यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेत येत्या दोन दिवसांत प्रभाग क्रमांक- २१, २२, २८, २९ या प्रभागातील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी आणि अतिधोकादायक झालेली झाडे तोडण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करुन दिली जातील, असे आश्वासन ‘केडीएमसी'चे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी उगले यांना दिले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण तहसील कार्यालयातील शौचालयाची दुरवस्था