प्रशासनाच्या तंटानाद विरोधात स्वराज्य पक्ष तर्फे घंटानाद
वाशी : कोपरखैरणे सेक्टर-४ मधील पादचारी रस्त्यावर ‘लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूल'ने कब्जा करुन स्थानिक रहिवाशांची पायवाट बंद केली आहे.याबाबत वारंवार पत्रव्यवहार करुन देखील नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दखल घेतली नसल्याने स्वराज्य पक्ष तर्फे १८ जून रोजी महापालिका कोपरखैरणे विभाग कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
‘लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूल'ने कोपरखैरणे सेक्टर- ४ मधील प्लॉट नंबर-९५ आणि ९६ या दोन भूखंडांच्या मधोमध नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध असलेला महापालिकेचा रस्ता बंदिस्त करुन नागरिकांची पायी रहदारी बंद केली आहे. सदर पादचारी रस्ता बंद असल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी सुमारे ८०० ते ९०० मीटर अंतर पायी चालत कापावे लागत आहे. याशिवाय समोर असलेल्या गार्डनमध्ये लहान मुले-मुलींना येण्यासाठी आणि नागरिकांना रेल्वे स्टेशन मध्ये जाण्यासाठी मोठी पायपीट करत नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोपरखैरणे सेक्टर- ४ मधील पादचारी रस्ता मोकळा करण्याचे आदेश तात्कालिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील २०१६ मध्ये दिले होते. मात्र, आजवर या ठिकाणी कारवाई करण्यात आली नाही. दुसरीकडे याबाबत पुन्हा एकदा स्वराज्य पक्ष तर्फे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करुन देखील या ज्वलंत विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणतीही ठोस भूमिका महापालिकेने न घेतल्यामुळे १८ जून २०२४ रोजी स्वराज्य पक्ष तर्फे महापालिका कोपरखैरणे विभाग कार्यालयात झोपी गेलेल्या शाळा आणि महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारला असता, महापालिका कोपरखैरणे विभाग अधिकारी सुनील काठोले यांनी, ‘येत्या १५ दिवसाच्या आत कारवाई करुन कोपरखैरणे सेक्टर-४ मधील पादचारी रस्ता पुन्हा पादचाऱ्यांसाठी सुरु केला जाईल' असे लेखी स्वरुपात आश्वासन दिले. त्यानंतर स्वराज्य पक्ष तर्फे घंटानाद आंदोलन थांबवण्यात आले.
दरम्यान, ‘लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूल'ने कब्जा केलेला कोपरखैरणे सेक्टर-४ मधील पादचारी रस्ता येत्या १५ दिवसात सुरु न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरुपात नवी मुंबई महापालिका मुख्यालय समोर करण्यात येणार असून, या होणाऱ्या आंदोलनाची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल, असा इशारा ‘स्वराज पक्ष'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष उमेश जुनघरे यांनी दिला आहे.