शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीतील नफ्याच्या अमिषाने फसवणूक  

नवी मुंबई : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा कमवता येतो, हे आपल्याला माहिती आहे. परंतु याचे ज्या लोकांना ज्ञान नाही, अशा लोकांना जास्त परताव्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडुन लाखो रुपयांची ऑनलाईन गुंतवणुक करुन घ्यायची, त्यानंतर चलाखी करत त्यांची संपूर्ण रक्कम हडप करायची.....अशा फसवणुकीच्या प्रकारात सध्या अनेक नागरीक कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या नादात आपसूक अडकत आहेत. तसेच लाखो नव्हे, तर कोटयवधी रुपये गमवून बसत आहेत. नवी मुंबईत अशा घटनांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबईत गत 6 महिन्यांमध्ये घडलेल्या अशा प्रकारच्या 40 पेक्षा अधिक गुह्यांमध्ये 30 कोटीहुन अधिकची रक्कम सायबर गुन्हेगारांनी हडप केल्याचे उघडकीस आले आहे.

नागरीकांना लुबाडण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवत असतात, यातलाच एक प्रकार म्हणजे शेअर मार्केट ट्रेडींग. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे अमिष दाखविणाऱया जाहिराती हे सायबर गुन्हेगार समाज माध्यमातून पसरवतात. या जाहिरातीला भुलून एखाद्याने जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यास अथवा लिंकवर क्लिक केल्यास ती व्यक्ती थेट सायबर गुन्हेगारांनी फसवणुक करण्यासाठी तयार केलेल्या व्हाट्सअँप ग्रुपमध्ये जोडली जाते. त्यानंतर व्हॉटसऍप ग्रुपमधील इतर सहभागी सदस्य चॅटींगद्वारे त्यांना शेअर मार्केट ट्रेडींगमुळे चांगला नफा मिळाल्याच्या खोटया भुलथापा मारुन, त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करतात. 

व्हॉट्सऍप ग्रुपमधील सदस्यांच्या चॅटींगवर विश्वास ठेवून ही व्यक्ती सुरुवातीला हजाराच्या पटीत गुंतवणुक करण्यास सुरुवात करते. यादरम्यान गुंतवणूक केलेल्या रक्कमेत अधिकचा लाभ झाल्याचे सायबर गुन्हेगार खोटया ऍपद्वारे दाखवून, त्यांना आणखी रक्कम गुंतवणुक करण्यास भाग पाडतात. या दरम्यान गुंतवणुकदाला काही रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर सायबर गुन्हेगारांकडुन गुंतवणुकीच्या बहाण्याने त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यात लाखोंच्या पटीत रक्कम घेतली जाते. तसेच  त्यांना गुंतवलेल्या रक्कमेत कोटयवधीचा लाभ झाल्याचे देखील भासविले जाते. त्यामुळे काही व्यक्ती कर्ज काढुन, घरदार, दागदागिने विकून सायबर गुन्हेगार सांगतील त्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास तयार होतात.  

जर या व्यक्तीने त्यातील रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यास वेगवेगळी कारणे सांगून त्याला पैसे काढण्यापासून रोखले जाते. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येईपर्यंत वेळ निघुन गेलेली असते, सायबर चोरटे त्याची कोटयवधीची रक्कम हडप करुन आपले मोबाईल नंबर बंद करुन पसार झालेले असतात. अशी फसवणुकीची पद्धत सध्या सर्वत्र सुरु आहे. कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या नादात तसेच सायबर गुन्हेगारांकडुन दाखवण्यात आलेल्या अमिषाला बळी पडुन अनेक नागरीक फसत आहेत. नागरिकांमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीसंदर्भात असलेले अज्ञात सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत असून या फसवणुकीच्या प्रकाराला सर्वाधिक उच्चशिक्षित नागरीक बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.  

फसवणुकीसाठी समाज माध्यमांचा वापर  

सायबर गुन्हेगार ऑनलाईन फसवणुकीसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम या सारख्या समाज माध्यमावरुन फसव्या जाहिराती पसरवून त्याद्वारे आपला सावज हेरतात. एखादी व्यक्ती गळाला लागताच त्यांना व्हॉट्सऍप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करुन घेऊन त्यांना इतरांचा नफा दाखवून त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे अमिष दाखविले जाते.  

बनावट ऍपचा वापर  

गुंतवणुकदाराकडुन घेतलेली रक्कम शेअर मार्केटमध्येच गुंतवण्यात आली आहे, हे भासवण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून बनावट ऍपद्वारे त्यांना मोठया प्रमाणा नफा झाला आहे, हे दाखविले जाते. त्यामुळे गुंतवणुकदार त्यावर विश्वास ठेवून मोठया प्रमाणात गुंतवणुक केली जाते.  

पोलिसांनी 11 कोटी गोठवले

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या 6 महिन्यांमध्ये घडलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुह्यात सायबर गुन्हेगारांनी 40 पेक्षा अधिक गुह्यांमध्ये 30 कोटीहुन अधिकची रक्कम हडप केली आहे. ऑनलाईन फसवणुक झालेल्या तक्रारदारांनी वेळीच सायबर पोलिसांकडे धाव घेतल्याने सायबर पोलिसांनी 15 गुन्हे उघडकीस आणुन फसवणुक झालेल्या नागरिकांची सुमारे 11 कोटीची रक्कम गोठवली आहे. तसेच या गुह्यात सहभागी असलेल्या 18 जणांना अटक केली आहे.  

गजानन कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे)

नागरीकांनी ऑनलाईन गुंतवणुकीच्या नफ्याच्या आमिषाला बळी पडु नये, तसेच कोणत्याही अज्ञात लिंकला प्रतिसाद देऊ नये, आर्थिक व्यवहार, गुंतवणूक करताना, खात्री करुनच आर्थिक व्यवहार करावेत. नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झाल्यास नागरीकांनी 1930 या टोल फ्रि नंबरवर संपर्क साधावा, अथवा सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन यावर तक्रार दाखल करावी.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दिवसा घरफोडी करणा-या सराईत चोरटयाला 24 तासात अटक