बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची दुरवस्था

कल्याण : सध्या राजकारणात सध्या मुळ शिवसेना आमची यावरुन माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. पण, हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणाऱ्या या दोन्ही शिवसेना पक्षांचे मात्र कल्याण मधील काळा तलाव (भगवा तलाव) याठिकाणी असलेल्या हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे स्मारकाकडे दुर्लक्ष झाले असून येथील समस्यांबाबत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'ने लक्ष वेधले आहे.  

१६ जून रोजी मनसे पदाधिकाऱ्यांनी काळा तलाव येथे जाऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. बाळासाहेबांच्या स्मारकाची दुरवस्था आणि असुविधांबाबत केडीएमसी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती ‘मनसे'चे विभाग प्रमुख कपिल पवार यांनी दिली. यावेळी ‘मनसे'चे विभाग अध्यक्ष कपिल पवार, संतोष अमृते, शाखा अध्यक्ष गणेश लांडगे, महेश बनकर, ऋषिकेश आमराळे, उपशाखा अध्यक्ष सुरेश कदम, सागर उमवणे, अर्थव सावंत, अभिनाष भालेराव, आदि पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

बाळसाहेबांची स्वप्नपूर्ती म्हणून कल्याण पश्चिम येथील काळा तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. वर्षभरापूर्वी या सुशोभिकरणाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, लोकार्पणावेळी देण्यात आलेल्या सुविधा अद्यापपर्यंत सुरु करण्यात आलेल्या नाहीत. दररोज हजारो नागरिक काळा तलाव येथे सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी येत असतात. त्यातील अनेक नागरिक येथे असलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकाला भेत देतात अथवा येथील गार्डन आणि कारंजाच्या ठिकाणी बसतात.
एकीकडे दोन्ही शिवसेना बाळासाहेबांवर आपला हक्क सांगत असताना कल्याण मधील काळा तलावातील बाळासाहेबांच्या  स्मारकाकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे कल्याण-डोंबिवली महापालिकेवर ‘शिवसेना'चीच सत्ता आहे.

सध्या प्रशासकीय राजवट असली तरी देखील राज्यात ‘शिवसेना'ची सत्ता आहे. तरी देखील येथील बाळासाहेबांच्या स्मारकाची दुरावस्था झाल्याची टिका कपिल पवार यांनी केली आहे.    

काळा तलावाच्या आतील बाजुस असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात पाण्याच्या टाकीची, बाथरुम, कारंजा यांची दुरवस्था झाली आहे. येथील कारंजामध्ये शेवाळे निर्माण झाले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे, लाईट बंद आहे.  स्मारकाच्या मागील बाजुस असलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी कोव्हीड काळापासून साफ करण्यात आलेली नाही. त्यामुळे टाकीतील पाणी दुषित झाले असून पाण्याला दुर्गंधी देखील येत आहे. तेच खराब झालेले पाणी पिण्याकरिता पाईप लावून कुलरने वापरण्यात येत आहे. स्मारकाच्या साईड भिंतींना भेगा पडलेल्या असल्याने पाण्याच्या टाकीत पावसाचे साचलेले पाणी पाणी टाकीत जाण्याची दाट शक्यता कपिल पवार यांनी वर्तवली आहे.

स्मारकातील पुरुष आणि महिला प्रसाधनगृहांची देखील दुर्दशा झालेली आहे. येथील नळ आणि पलश तुटलेले आहेत. तलावतील कारंजे आणि साऊंड सिस्टीम बंद असून तलावातील साफसफाई देखील होत नाही. त्यामुळे तलावात बाटल्या, प्लास्टीक आणि कचऱ्याचा थर जमा झाला आहे. याबाबत वारंवार तक्रार देऊन सुध्दा ‘केडीएमसी'चे अधिकारी याकडे  दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर काळा तलाव येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकातील समस्या न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशाराही कपिल पवार यांनी दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली खाडीकिनारी महापालिका तर्फे जनसहभागातून विशेष स्वच्छता मोहीम