ठामपा ॲक्शन मोडवर

ठाणे : ठाणे शहरात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. मात्र, पावसाळ्यात या इमारतींना धोका निर्माण होऊन इमारती पडतात आणि दुर्दैवी घटना घडतात. यासाठी खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी केली आहे. त्याअनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी १४ जून रोजी बैठकीत दिलेल्या आदेशानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी कोपरीत १४ इमारतींचे तर नौपडा परिसरातील १२ इमारतींची पाणी, वीज आणि ड्रेनेज लाईन खंडीत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आता अतिधोकादायक इमारतींवर संक्रांत ओढवणार आहे. नौपाडा आणि कोपरी महापालिका प्रशासनाच्या रडारवर राहिले.

१५ जून रोजी महापालिकेने २६ इमारतींची पाणी, वीज आणि ड्रेनेज लाईन खंडीत करण्यासह २ इमारतींवर तोडक कारवाई केली आहे. महापालिकेच्या वर्गवारीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात अतिधोकादायक इमारती ९५ पेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. त्यापैकी ३५ पेक्षा अधिक इमारतीत नागरिकांचे आजही वास्तव्य आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला कारवाई करण्यास अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकारी यांनी खाजगीत माहिती दिली. तर कोपरीमध्ये २५ पेक्षा अधिक अतिधोकादायक इमारती, माजिवडामध्ये १, उथळसरमध्ये ३, कळवा मध्ये २ आणि मुंब्रा परिसरात ४ इमारतींचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतलेल्या बैठकीत जवळपास सर्वच सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. दरम्यान, आयुवत सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशची अंमलबजावणी त्वरित कोपरी आणि नौपाडा परिसरात करण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पूरप्रवण किनाऱ्यावर बालाजी मंदिर