‘पांडवकडा'च्या पायथ्याशी  फुलली वनराई

खारघर : विश्वात्मके देवे साधक मंडळी सदस्यांनी खारघर मधील पांडवकडा डोंगराच्या पायथ्याशी केलेल्या रोप लागवडीमुळे पांडवकडा परिसरात वनराई पसरली आहे. झाडांवरील पेरु,काजू आदी फळे पक्षांचे खाद्य झाले असून, फुललेल्या वनराईमुळे पक्ष्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्यामुळे पर्यावरण प्रेमी समाधान व्यक्त करीत आहेत.  

५ जून या जागतिक पर्यावरण दिनी वृक्षप्रेमी रोप लागवड करुन  पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प करतात. मात्र, खारघर मधील  विश्वात्मके देवे साधक मंडळी मधील पर्यावरण प्रेमी खारघर मधील पांडवकडा डोंगराच्या पायथ्याशी आंबा, काजू, पेरु, चिंच, वड, जांभूळ आदी विविध वृक्षरोपांची लागवड करुन गेल्या पंधरा वर्षांपासून लावलेल्या रोपांचे संवर्धन करीत असल्यामुळे  पांडवकडा डोंगराच्या पायथ्याशी वनराई बहरली आहे .

खारघर डोंगर पूर्वी खारघर गावाचे वैभव म्हणून ओळखला जात होता. हिरवाईने नटलेल्या खारघर डोंगरात पूर्वी आंबा,फणस, करवंद, जांभूळ आदी फळांचा आस्वाद ग्रामस्थ घेत होते. तसेच पक्ष्यांची किलबिल, विविध फुलांच्या झाडांचा गंध दरवळत होता. ‘सिडको'ने खारघर शहर विकसित करताना जमीन सपाटीकरण आणि विकासाच्या नावाखाली शेतजमिनीवरील वृक्षतोड करुन सिमेंटचे जंगल उभे केले. तसेच डोंगरावर लावल्या जाणाऱ्या वणव्यामुळे खारघर डोंगरावरील हजारो झाडे नष्ट झाली.

दरम्यान, १५ वर्षांपूर्वी खारघर मधील विश्वात्मके देवे साधक मंडळी सदस्यांनी पांडवकडा धबधबा डोंगर परिसरात १० हजारापेक्षा अधिक जांभूळ, पिंपळ, वड, फणस, आंबा, कडूनिंब, बाभूळ, चिंच, अर्जुन आदी विविध जातीच्या देशी झाडांची रोप लागवड करुन या झाडांना पांडवकडा धबधबा लगत असलेल्या ओढ्यात मोटार पंप लावून पाणी दिले असल्यामुळे खारघर डोंगरावर लावण्यात आलेली झाडे १० ते १५ फुटापर्यंत मोठी झाली आहेत. विश्वात्मके देवे साधक मंडळी सदस्यांनी लागवड केलेल्या पेरु, काजू या झाडांना फळे येत असल्यामुळे या फळांचा आस्वाद पक्षी घेत आहेत. खारघर डोंगर परिसर हिरवागार दिसत झाल्यामुळे या डोंगरावर येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. लागवड केलेल्या रोपांचे संवर्धन करण्यासाठी मार्गदर्शक पुरुषोत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मके देवे साधक मंडळी सदस्य दादासाहेब मोटे, डॉ. सुभाष सावंत, दादासाहेब दहीगंडे, डॉ. विजय नलावडे आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत.

झाडे पक्ष्यांना अन्न देतात, झाडावर असलेली काही किटके पक्ष्यांचे अन्न बनतात तर काही पक्षी झाडावर घरटी बांधतात. तसेच गेल्या काही वर्षांपासून वाढत्या तापमानाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रोप लागवड करणे आवश्यक आहे. येत्या पावसाळ्यात पांडवकडा डोंगरावर एक हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात येणार आहे. - डॉ. विजय नलावडे, सदस्य - विश्वात्मके देवे साधक मंडळी, खारघर.

खारघर मधील गोल्फ कोर्स लगत असलेल्या डोंगरावर तर तळोजा मध्यवर्ती कारागृह शेजारील डोंगरच्या पायथ्याशी पर्यावरण प्रेमी धर्मेंद्र कर तसेच आय नेचर फाउंडेशन या संस्थेने ५० प्रजातीची  रोपांची लागवड केली असून, मोटार पंप द्वारे पाणी देवून झाडे जगविली जात आहेत. त्यामुळे खारघर डोंगर हिरवागार दिसत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठामपा ॲक्शन मोडवर