दुर्गाडी किल्लासमोर ‘शिवसेना'च्या दोन्ही गटांकडून घंटानाद

डोंबिवली : ‘बकरी ईद'च्या दिवशी हिंदू बांधवांना दुर्गाडी येथील दुर्गामाता मंदिरात प्रवेश बंदी घालण्यात येत असल्याने शिवसैनिक या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर घंटानाद करण्यासाठी जातात. या ‘बंदी'चा विरोध करत १७ जून रोजी दुर्गाडी किल्ला येथे विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी केली.

‘शिवसेना'चे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ३८ वर्षांपूर्वी  १९८६ च्या दशकात या ‘घंटानाद आंदोलन'ला सुरुवात केली आहे. ‘बकरी ईद'ला दुर्गाडी किल्ल्यावर बंदी असल्याने शिवसैनिक घंटानाद करतात. १७ जून रोजी ‘कल्याण'च्या लोकमान्य टिळक चौक येथून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याकडे कुच केली. मात्र, पोलीस प्रशासनाने ‘शिवसेना'च्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना लालचौकी परिसरातच बॅरीकेट लावून रोखून धरले. यावेळी काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ धक्काबुक्कीही झाली. ‘शिवसेना'च्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरु झालेले घंटानाद आंदोलन त्यांच्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी २० वर्षे कायम ठेवले आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत सदर आंदोलन सुरुच राहील, असे ‘शिवसेना (शिंदे गट)'चे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.

सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेली अनेक वर्षे या ‘घंटानाद आंदोलन'चे नेतृत्व केले. आज त्यांचे सरकार असताना स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचेच प्रशासनातील अधिकारी दुर्गाडी किल्ल्यावर बंदीचा आदेश काढत आहेत. यावरुन सदर डुप्लीकेट हिंदुत्ववादी सरकार असून आम्ही त्याचा निषेध करत करतो, अशा शब्दात ‘शिवसेना (ठाकरे गट)'चे विजय साळवी यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न