नवी मुंबई पोलीस भरतीसाठी ६ हजार अर्ज  

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या आस्थापना वरील १८५ पोलीस शिपाई पदांकरिता नवी मुंबई पोलीस दलाकडे जवळपास ६ हजार उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. यामध्ये ४,५१० पुरुष तर १,३६२ महिला तसेच ११२ माजी सैनिकांचा समावेश आहे. या उमेदवारांची मैदानी चाचणी येत्या १९ ते २४ जून २०२४ या कालावधीत कळंबोली मधील नवी मुंबई पोलीस मुख्यालय क्रीडांगणावर होणार आहे.  

ऐन पावसाळ्यात होत असलेल्या या पोलीस भरती प्रक्रियेसाठी नवी मुंबई पोलिसांनी सर्वप्रकारची तयारी पूर्ण केली असून शास्त्रोवत आणि पारदर्शक पध्दतीने सदर पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. याप्रसंगी सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे उपस्थित होते.  

पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यापूर्वी त्यांची शारीरिक चाचणी (छाती, उंची) पीएसटी मशीनच्या सहाय्याने शास्त्रोक्त पध्दतीने घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी गोळा फेक, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे त्याचप्रमाणे महिला उमेदवारांकरिता गोळा फेक, १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे आदि स्पर्धा होणार आहेत. पहिल्या दिवशी ७०० आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी १ हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे, असे पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

 मैदानी चाचणी झाल्यानंतर उमेदवारांना त्यांचे गुण दाखविले जाणार असून त्यावर त्यांची सही घ्ोतली जाणार आहे. उमेदवाराला काही तक्रार असल्यास त्याठिकाणी अपील कमिटीसुध्दा तैनात राहणार आहे. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने मैदानी चाचणीवेळी रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळख (आर.एफ.आय.डी.) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून प्रत्येक टप्प्यावर सीसीटिव्ही कॅमेरे आणि व्हिडीओग्राफीचा देखील वापर केला जाणार असल्याचे पोलीस आयुक्त भारंबे यांनी सांगितले.  

भरती प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...  

पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याकरिता उमेदवारांची उंची, छाती मोजमाप अचुक आणि जलदगतीने करुन सर्व तपशिल संगणकावर साठवून ठेवण्यासाठी डिजीटल पीएसटी मशीनचा वापर करण्यात येणार आहे. तसेच धावण्याच्या शर्यतीचे अचुक परिमाण काढण्याकरीता रेडिओ फ्रिक्वेनसीशी संबंधित असलेल्या आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

गैरप्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र पथके...

भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही यासाठी मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दलालामार्फत होणारा भ्रष्टाचार, गैरव्यवहार रोखण्यासाठी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून या पथकामार्फत भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.  

भरती प्रक्रिया ठिकाणी उमेदवार, पोलिसांना मोबाईल फोन वापरास मनाई...

भरती प्रक्रियेच्या बंदोबस्ताला नेमलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार असून ओळखपत्राशिवाय कोणत्याही व्यक्तीस भरती सुरु असलेल्या मैदानात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भरती परिसरात नेमलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना तसेच उमेदवारांना मोबाईल फोनचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.  

राज्यभरातून येणाऱ्या उमेदवारांसाठी सोयी-सुविधा...  

नवी मुंबई पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी उमेदवारांच्या सोयीसाठी जागोजागी सूचना फलक, फिरते प्रसाधनगृह, वैद्यकीय सेवा, पाण्याची आणि उपहारगृहाची सोय करण्यात आली आहे. तसेच परगावाहून येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था मोहन पाटील शाळेमध्ये करण्यात आली आहे. उमेदवारांना सकाळी ५ वाजता कळंबोली येथील पोलीस भरतीच्या ठिकाणी पोहोचता यावे यासाठी पनवेल, मानसरोवर आणि सीबीडी रेल्वे स्थानकाहून विशेष बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मैदानात १६००, १०० मीटर अंतराच्या धावणी स्पर्धेच्या सुरुवातीस उमेदवारांना केळी, बिस्कीटे तसेच इतर खाण्याच्या वस्तू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘पांडवकडा'च्या पायथ्याशी  फुलली वनराई