ठाणेकरांच्या पैशाची उधळपट्टी!

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने २०१६ साली घोडबंदर येथे सेवा रस्ता बांधण्यात आला होता. वाहतूक काेंडीची समस्या कमी करण्यासाठी तसेच पार्किंगची सुविधा होण्यासाठी या रस्त्यांचे नव्याने बांधकाम करण्यात आले होते. पण, गेल्या ८ वर्षांमध्ये सदर रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करुन देखील त्याचा उपयोग ठाणेकरांना अद्यापही झालेला नाही. त्यामुळे महापालिकेने ३ वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी खर्च केलेले १७.५० कोटी रुपये पाण्यातच गेल्याचा प्रकार ‘मनसे'चे स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणला आहे. या कार्यप्रणालीमुळे महापालिकेचा नवा फंडा समोर येत आहे. कोट्यवधी खर्च करुन रस्ता बनवायचा आणि नंतर विविध प्राधिकरणाद्वारे खोदून रस्ता चाळण करण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.

१७.५० कोटींचा खर्च केलेल्या रस्त्याचे विविध प्राधिकरणांनी खोदकाम करीत चाळण केल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे. त्यामुळे यंदाही ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सोसावा लागणार आहे.

घोडबंदर सर्विस रोडच्या डागडुजीकरिता २०२० साली ठाणे महापालिकेच्या वतीने १७.५० कोटी रुपये मंजूर केले होते. यानंतर सदरचे काम २०२३ साली पूर्ण करण्यात आले. पण, सदर काम होऊन एक वर्ष होत नाही तो तिथेच विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून बहुतेक जागेवर रस्ता उखाडण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने घोडबंदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तर शासनाच्या वतीने या रस्त्याचे देखभाल-दुरुस्ती कालावधी ३ वर्ष असून देखील विविध प्राधिकरणांच्या वतीने सदर रस्ता एक वर्षाच्या आतच खोदण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सध्याच्या परिस्थितीत रस्त्याच्या खोदकामामुळे पावसाळ्यात ठाणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक काेंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे सदर सर्व्हिस रोडवर वारंवार विविध प्राधिकरणांकडून कामे केली जातात. पण, रस्त्याची निगा आणि देखभाल न ठेवल्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर अपघाताच्या घटनाही वारंवार घडत आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका मात्र पावसाळ्यात ठाणेकरांना सहन करावा लागणार आहे.

घोडबंदर रस्ता राज्य महामार्ग आहे. याची देखभाल करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि ठाणे महापालिकेचे असून देखील या सर्व प्राधिकरणांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडणे, पाणी साचणे आणि वाहतूक काेंडीची समस्या याचा नाहक त्रास ठाणेकर नागरिकांना वर्षानुवर्षे भोगावा लागत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी तातडीने लक्ष घालून ठाणेकर नागरिकांना सदर समस्येतून मुक्त करावे. -स्वप्नील महिंद्रकर, शहराध्यक्ष - मनसे जनहित - विधी विभाग, ठाणे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नवी मुंबई पोलीस भरतीसाठी ६ हजार अर्ज