दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची खा. सुरेश म्हात्रे यांच्याकडून पाहणी
कल्याण : ‘कल्याण'चे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची १३ जून रोजी पडझड झाली असून ‘भिवंडी'चे नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी ‘महाविकास आघाडी'च्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली. त्यावेळी खा. सुरेश म्हात्रे यांनी ‘पीडब्ल्यूडी'च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असता जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील बुरुजाचा भाग १३ जून रोजी रात्रीच्या सुमारास ढासळला. विशेष म्हणजे ‘पीडब्ल्यूडी'कडून काही वर्षांपूर्वीच या बुरुजाचे काम करण्यात आले होते. सदर बुरुज ढासळल्याची माहिती मिळताच सायंकाळच्या सुमारास ‘पीडब्ल्यूडी'चे अधिकारी, ‘केडीएमसी'चे अधिकारी आदिंच्या उपस्थितीत ‘भिवंडी'चे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आधी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी केली.
त्यावेळी अधिकाऱ्यांकडून दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर खा. सुरेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी फोनवर चर्चा केली. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या तातडीने डागडुजीचे महत्त्व त्यांना पटवून दिले. त्यावर ठाणे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी उपस्थित ‘पीडब्ल्यूडी'च्या अधिकाऱ्यांना फोनवरच लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरु करण्याचे आदेश दिल्याचे दिसून आले. त्यामुळे किल्ल्याच्या डागडुजीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.
मला माझ्या मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले काम करायचे आहे. त्यामुळे आपण विकासकामांसाठी कोणाकडूनही एक रुपया घेणार नाही. जर काम चांगले केले नाही तर मग तो कंत्राटदार असो की शासकीय अधिकारी, त्यांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु. -खासदार सुरेश म्हात्रे, भिवंडी.