पावसाळी खेकड्यांचे बाजारात आगमन

वाशी : पावसाळा सुरु होताच शेतात आणि जंगलात काळे (कुरल्या) पिवळे खेकडे (मुठे) बाहेर पडतात. खेकडे खाण्यासाठी अतिशय आणि आरोग्य वर्धक असल्याने खेकड्यांना अधिक मागणी   असते. त्यामुळे नवी मुंबईतील गावा-गावात खेकडे विक्री करण्यासाठी दाखल होत असून, मुठे १०० ते १२० रुपये डझन तर कुरल्या ४५० ते ५०० रुपये डझन दराने विक्री होत आहे.

पाऊस पडायला सुरुवात होताच निसर्ग हिरवा शालू परिधान करण्यासह सोबतच अनेक सात्विक आहार उपलब्ध करुन देतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे पावसाळी (मुठे) आणि (कुरल्या) काळे खेकडे. या खेकड्याची विशेषतः आगरी-कोळी समाजातील खवय्ये वर्षभर वाट पाहत असतात. नवी मुंबई शहरात नागरी आणि औद्योगिक वसाहत  उभी राहण्याआधी येथील सुपीक शेतजमीनीत पावसाळ्यात खेकडे हमखास उपलब्ध होत होते. मात्र, हिरव्या जंगलाच्या जागेवर काँक्रिटचे जंगल उभे राहिल्याने येथील नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट झाली. परंतु, नवी मुंबई शहरातील महापे, रबाळे आणि शिरवणे डोंगरात तुरळक प्रमाणात पावसाळी खेकडे सापडतात.त्यासाठी येथील निवडक आदिवासींना खूप मेहनत घ्यावी लागते. नवी मुंबई शहरात आजही पावसाळी (मुठे) आणि (कुरल्या) काळे खेकडे मुबलक भेटत नसले तरी येथील ग्रामस्थांच्या खाद्य संस्कृती मधील खेकडा, अविभाज्य घटक म्हणून आजही कायम आहे. त्यामुळे पावसाळ्यात नवी मुंबई मधील आगरी-कोळी समाजातील घराघरात खेकडे शिजवले जात असल्याने या खेकड्याची मागणी कायम आहे. मात्र, आता अधिकांश खेकडे नवी मुंबई शहराबाहेरुन उरण, ठाणे येथील ग्रामीण भागातून नवी मुंबई शहरात विक्रीसाठी दाखल होत असून, तुर्भे गाव, कोपरखैरणे, घणसोली, गोठिवली, शिरवणे, ऐरोली, करावे, बोनकोडे आदी गावात  खेकडे अधिक प्रमाणात विक्रीसाठी दाखल होतात. बाजारात पिवळे मुठे १०० ते १२० रुपये डझन तर काळे खेकडे ४५० ते  ५०० रुपये डझन दराने विक्री होत आहेत. विशेष म्हणजे खेकडे खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे.
------------------------------------
पूर्वी आमची शेती असताना सहज खेकडे उपलब्ध होत होते. शेतीत मिळणारे खेकडे  आम्ही  स्वतः पकडून शिजवत होता. आता   शेती गेल्याने खेकडे देखील नामशेष झाले आहेत. मात्र, खेकडे आमच्या खाद्य संस्कृतीतील एक मुख्य घटक  असून, खेकडे आरोग्य वर्धक असतात. त्यामुळे नवी मुंबई शहरातील ग्रामस्थ प्रत्येक पावसाळ्यात खेकडे  विकत घेऊन खातात. - रोशनी वेटा, गृहिणी - कोपरखैरणे गाव. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर मधील ग्रीन व्हॅली नर्सरी मध्ये वृक्षारोपण