ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कुलला यश

ठाणे : रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘महिला-बाल विकास विभाग'ने नाविन्यपूर्ण योजनांतर्गत फिरते पथक (मोबाईल स्कुल) अशी संकल्पना राबविली होती. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महापालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रातील ४५०-५०० बालकांना यंदाच्या सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश देण्याचा कार्यक्रम येत्या २१ जून २०२४ रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला-बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.

रस्त्यावरील बालकांसाठी ‘महिला-बाल विकास विभाग'ने नाविन्यपूर्ण योजनांतर्गत सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात फिरते पथक (मोबाईल स्कुल) अशी संकल्पना ठाणे जिल्ह्यासह राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२३ पर्यंत सदर कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. साधारणतः १७० रस्त्यावरील बालकांना सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये ठाणे आणि भिवंडी महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आले होते.

या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महापालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्यावरील बालकांबरोबर ‘महिला-बाल विकास विभाग'च्या ठाणे कार्यालयाने गेले ६ ते ७ महिने काम करुन बालकांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविली आहे. सदर बालकांना शाळेमध्ये प्रवेश द्यावा आणि त्यांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे, यासाठी बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. या सर्वांना परिपाक म्हणून साधारणतः यावर्षी सन २०२४-२०२५च्या शैक्षणिक वर्षामध्ये रस्त्यावर राहणारी आणि शाळेत न जाणारी ४५० ते ५०० बालके विविध महापालिकेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात येणार आहेत.

सदर बालकांच्या शाळेचे प्रवेशपत्र ‘महिला-बाल विकास विभाग'चे सचिव अनुप कुमार यादव यांच्या शुभहस्ते २१ जून रोजी वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महिला-बालविकास आयुक्त उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच सन २०२३-२४ या वर्षात इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील ५० मुलांचा सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला आहे, असे ठाणे जिल्हा महिला- बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली मधील ३ अनधिकृत बांधकामे निष्कासित