पालक सचिवांकडून जिल्ह्यातील खड्डे, धोकादायक इमारती, होर्डिंग, नाले सफाई, आरोग्य सुविधांचा आढावा

ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा तसाच पावसाळ्याच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात एकही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी. तसेच ठाणे जिल्हा राज्यात स्वच्छ-हरित व्हावा, यासाठी प्रत्येक विभागाने सहभागी होऊन प्रयत्न करावे, असे निर्देश सुजाता सौनिक यांनी यावेळी दिले.

अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी १३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, पोलीस यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, ठाणे पोलीस सह-आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, ‘जिल्हा परिषद'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, उपसंचालक आरोग्य डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

ठाणे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा सौनिक यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्त्यांवरील खड्डे, धोकादायक इमारती, होर्डिंग, नाले सफाई, आरोग्य सुविधा यांची माहिती घेतली. जिल्ह्यातील होर्डिंगचा आढावा घेऊन धोकादायक, नियमानुसार नसलेली होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची कार्यवाही करावी. विशेषतः रेल्वे मार्गालगत, रस्त्या लगतच्या होर्डिंगवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाने धोकादायक इमारतींची माहिती गोळा करुन अशा इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या निवारास्थळी हलवून ती इमारत तातडीने रिकामी करावी. नालेसफाई करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे पालक सचिव सौनिक यांनी सूचित केले. 

राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या मार्फत अनेक स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यात येते. अशा स्टार्टअपची मदत घेऊन ठाणे जिल्हा स्वच्छ, सुंदर आणि हरित करुन राज्यात आघाडीवर असावा, यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. झाडांवरील लाईटींग तातडीने काढून टाकण्यात यावीत. पावसाळ्यात झाडे पडून अपघात होतात. ते टाळण्यासाठी शास्त्रीय पध्दतीने नियमितपणे वृक्ष छाटणी होईल, याची दक्षता घ्यावी. पाणी साचणाऱ्या सकल भागाची तातडीने माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी सेन्सरचा वापर करावा. तसेच पाणी साचत असल्यास त्यासंबंधीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, असे सौनिक म्हणाल्या. 

नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवा...

पावसाळ्याच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे नियंत्रण कक्ष अव्याहतपणे सुरू ठेवावे. या ठिकाणी प्रत्येक विभागाचा कर्मचारी असेल याची दक्षता घ्यावी. नियंत्रण कक्षात जमा होणाऱ्या माहितीचा वापर सुयोग्यपणे करण्यासाठी एआय आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच पोलीस विभागाचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरु असतील याची दक्षता घ्यावी. आणखी सीसीटीव्हीची आवश्यकता असल्यास ‘जिल्हा नियोजन'कडून निधीसाठी प्रस्ताव पाठवावे. रस्ते सुरक्षेसाठी महामार्गावरील धोकादायक स्थळांची माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, महापालिकेच्या सहाय्याने योग्य उपाययोजना करावे, अशा सूचनाही पालक सचिच सौनिक यांनी यावेळी दिल्या.

ठाणे जिल्ह्यात ई-ऑफिसचा प्रभावी वापर करावा...

प्रशासनाचे काम जलदगतीने होण्यासाठी राज्य शासनाने ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरू केला आहे. ठाणे जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यालयीन नस्ती, पत्रव्यवहारासाठी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करावा. राज्यात ई-ऑफिस प्रणालीचा १०० टक्के वापर करणारा ठाणे जिल्हा व्हावा, यासाठी सर्वच विभागाने प्रयत्न करावे, असे आवाहनही सुजाता सौनिक यांनी यावेळी केले. 

तत्पूवी जिल्हाधिकारी शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त राव यांच्यासह इतर विभाग प्रमुखांनी पावसाळी कालावधीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आपत्तीकाळात मदतीसाठी जिल्ह्यात यंत्रणांनी सज्जता केली आहे. जिल्ह्यातील ५०० तरुणांना आपदामित्र म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती शिनगारे यांनी यावेळी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कुलला यश