नवी मुंबई शहरात पाणी कपातीत वाढ

नवी मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाने दडी मारल्याने सर्वत्र पावसाची आतुरतेने वाट बघितली जात आहे. स्वतःचे जलाशय अर्थात धरण असणाऱ्या नवी मुंबई शहरात देखील आता पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात नवी मुंबईकरांना किमान जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करता येईल इतका जलसाठा असतानाही म्हणावा तसा पाऊस न बरसल्याने आगामी काळात भीषण पाणी टंचाईची समस्या उद्‌भवू नये यासाठी महापालिकेने आता पाणी कपातीत वाढ करुन शहरात विभागनिहाय ३ दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, यापूर्वी पावसाचे आगमन गृहित धरुन महापालिकेने ४ जून पासून नोडनिहाय आठवड्यातून २ दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण, मोरबे धरणातील जलाशयामध्ये होत असलेली घट आणि अपेक्षेप्रमाणे पाऊस न बरसल्याने आता आठवड्यातून ३ दिवस नोडनिहाय पाणी पुरवठा बंद ठेवण्याची वेळ नवी मुंबई महापालिकेवर ओढवली आहे. त्यामुळे नवी मुंबईकर नागरिकांनी देखील पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेचे अतिरिवत शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी केले आहे.

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण परिसरात पाऊस खूपच कमी बरसला आहे. परिणामी, मोरबे धरणातील पाणी साठ्यात कमालीची घट होत असल्याने नवी मुंबईकरांची तसेच महापालिकेची चिंता वाढली आहे. पाऊस जर लांबला तर मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शवयता आहे. यासाठी संभाव्य पाणी समस्येवर उपाययोजना म्हणून नवी मुंबई महापालिकेने शहरात केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यातच मोरबे धरणात शिल्लक असलेला पाणी साठ्याचा जपून वापर व्हावा यासाठी महापालिकेने या आधी विभागनिहाय  आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता नवी मुंबईमध्ये विभागनिहाय  आठवड्यातील दोन दिवस पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. सदर निर्णयाची १३ जून पासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका विभागनिहाय संध्याकाळचा पाणी पुरवठा बंदचे वेळापत्रकः

विभाग      सद्यस्थितीत पुरवठा बंद      सुधारित पाणी पुरवठा बंद
बेलापूर           सोमवार, गुरुवार         सोमवार, बुधवार, शुक्रवार
नेरुळ            मंगळवार, शनिवार       मंगळवार, गुरुवार, शनिवार
तुर्भे               बुधवार, रविवार           मंगळवार, गुरुवार, रविवार
वाशी            गुरुवार, सोमवार          सोमवार, बुधवार, शुक्रवार
कोपरखैरणे    मंगळवार, शनिवार       मंगळवार, गुरुवार, शनिवार
घणसोली        बुधवार, रविवार            बुधवार, शुक्रवार, रविवार
ऐरोली              शुक्रवार                     मंगळवार, शुक्रवार
सिडको नोड   सोमवार, गुरुवार          सोमवार, गुरुवार, शनिवार.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा ढासळला भाग