‘अपहिल कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन'मध्ये ‘महावितरण'चे अभियंता किरण चौधरी यांचे यश

नवीन पनवेल : जगातील सर्वांत आव्हानात्मक आणि खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिका मधील १०० वर्षांची पंरपरा असलेल्या अपहिल कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन स्पर्धा मध्ये सहभागी होत ‘महावितरण'चे सहाय्यक अभियंता किरण चौधरी यांनी ८६.६ कि.मी. अंतर अवघ्या १० तास ५६ मिनिटे ३६ सेकंदांत पूर्ण करुन यश संपादित केले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते पीटरमारित्झबर्ग या दोन शहरादरम्यान ८६.६ कि.मी. अंतराची मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी १२ तासांचा कालावधी निश्चित केला जातो. किरण चौधरी  यांनी १० तास ५६ मिनिटे ३६ सेकंदामध्ये सदर ८६.६ कि.मी.चे अंतर पार करुन आपली शारीरिक क्षमता सिध्द केली आहे. चढण आणि उतार अर्थात अप ॲण्ड डाऊन या पध्दतीने सदर स्पर्धा घेतली जाते.

यावर्षी मॅरेथॉनचा मार्ग अपहिल म्हणजेच चढणीचा होता. या अंतर्गत १२ तासांमध्ये ५,९२३ फुट उंचीचे अंतर पूर्ण करायचे होते. समुद्रसपाटीपासून ते अंतर जवळपास १८०० मीटर उंचीवर आहे. या मार्गातील लहान-मोठ्या २० ते २५ टेकड्या चढणे बंधनकारक असते. विशेष म्हणजे सदर शर्यतीमध्ये एकूण ६ कट ऑफ होते आणि ते कट ऑफ दिलेल्या वेळेत पूर्ण करणे तेवढेच बंधनकारक होते.

दरम्यान, मागील वर्षी किरण चौधरी यांनी लडाख मधील ७२ किलोमीटर खार्डुंगला अल्ट्रा मॅराथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊन यश प्राप्त केले होते. तसेस मुंबई मॅरेथॉनसह महाराष्ट्रातील विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये ते नियमित भाग घेतात. कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन स्पर्धेसाठी पहाटेच्या सुमारास नवी मुंबईतील रस्त्यांवर, डोंगररांगांवर तसेच लोणावळा येथे जाऊन कसून सराव केला होता. शारीरिक, मानसिक, समर्पण आणि चिकाटी आदि गुणांची चाचणी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते, असे किरण चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Read Previous

शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी

Read Next

‘योग मंत्रा'द्वारे नमुंमपा मार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा