शोध कशापायी। मी तुमच्या ठायी

डॉ.बाबासाहेबांनी एकाही मराठी, हिंदू व मुस्लिम अशा कोणत्याही समकालीन संताचे नांव घेतले नाही, कारण संत कविच्या दैदिप्यमान मालिकेमध्येही कोणीही संत बाबासाहेबांना स्फूर्ती देऊ शकला नाही. त्यांना एकच संत आढळला तो ही उत्तरेमधला संत कबीर ! बहुजन समाजाचा खराखुरा समाजवादी संत. त्यांनी आयुष्यभर जातीभेद, विषमता, दृष्ट रुढीविरुध्द अत्यंत प्रखरपणे लढा दिला. आपल्या फटकळ वाणीच्या फटकाऱ्याने समाज विरोधी शक्तींना ठणकावले. ते निर्भय आणि निबैर होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाव जीवनात त्यांना गुरु मानले. कारण डॉ. बाबासाहेबांचे घराणे कबीर पंथी असल्याने त्यांच्यावर ते संस्कार होतेच. त्यांचे ऋण अगदी मोकळया मनाने कृतज्ञतेने मान्य केले. कारण शुद्रातिशुद्रासाठी ज्वलजहालपणे लढणारे तेच एकमेव संत त्यांना वाटले. त्यांची स्वतःची श्रध्दा, करुणा, मानवता त्यांना पुरेशी होती. कबीरांच्या जीवनाचा आणि तत्वाचाही बाबासाहेबांवर फार मोठा परिणाम झाला. त्यांच्या जीवनाशी व बाबासाहेबांच्या कर्तृत्वाशी बरेच साम्य होते. सत्यनिष्ठा, संघर्ष, आणि समर्पण ही दोघांच्या जीवनाची वैशिष्टये आहेत. गुरुनां दोन्ही अनन्य साधारण महत्व देतात. पण तो गुरु त्यांना बांधून ठेवत नाही, तर अत्त-दीप-भवं म्हणून मुक्त करतो. कबीरांना बुध्दाच्या तत्वज्ञानाचे रहस्य कळाले.

 भगवान बुध्दांचे, संत कबीरांचे बरेचसे तत्वज्ञान बाबासाहेबांनी भारतीय संविधानात एकत्रित गुंफून संपूर्ण देशात जातीवाद, असमानता यांना थारा दिला नाही. बालपणी झालेले योग्य संस्कार आणि तारुण्यात संस्काराचा बाहय आणि आंतरिक, सामाजिक कर्मकांड, अंधश्रध्दा या सारख्या अनेक समस्यांपासून समाजाचे संरक्षण होऊ शकते. गरीब दीन-दुबळयांची सेवा करण्याचे बळ मिळू शकते. लोकांना असाच सात्विक मार्ग दाखविण्यासाठी येथील महापुरुषांनी, संत महात्म्यांनी आपल्या आध्यामिक मार्गाने जागरण केले. त्यांच्या प्रयत्नांने समाज सशक्त, बलसंपन्न, भयमुक्त होण्यास मदत मिळाली त्यात संत कबीर अग्रणी आहेत.

विविध प्रकारच्या छटा या जगामध्ये आहेत या सर्वांचा आस्वाद या दोहयात आपल्याला पाहायला मिळतो. हिच त्यांच्या अमरत्वाची साक्ष असून या दोहयाच्या माध्यमातून संत कबीर आजही जनमानसात प्रचलित आहेत. संत कबीर म्हणतात, ”बुरा जो देखन मै चला, बुरा न मिला कोय। जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय।” लोकांची निंदा करणे, त्यांची चुगली करणे हे काही बरोबर नाही. ते सुध्दा चांगले आहेत हा विचार आपल्या मनी बाळगावा म्हणजे आपल्या लक्षात येईल की, आपण जो नकारात्मक विचार दुसऱ्या विषयी करतो तेच मुर्खपणाचे लक्षण आहे. म्हणजेच आपल्या विचारात सुधारणा होईल, लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, त्यालाच सम्यकदृष्टी म्हणतात.
 लहानपणीच पालनकर्त्याचे निधन झाल्याने त्यांचा पिढीजात विणकराचा व्यवसाय कबीराने सांभाळला. परंतू मुळातच त्यांची वृत्ती विरक्त असल्यामुळे त्यांचे मन इकडे तिकडे भटकू लागले. शेवटी प्रपंचासाठी उद्योग करणे आवश्यक होते. उत्तर भारतातील तत्कालीन सर्वश्रेष्ठ प्रवर्तक स्वामी रामानंद निर्गुण भक्तीचे, भेदांचे कडवे विरोधक, आणि स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी त्यांचा अट्टाहास असायचा. त्यांच्या शिष्यवर्गात अनेक जातीचे संत होते. तेव्हा कबीराने सुध्दा स्वामीजींचे शिष्यत्व पत्करले. भक्ती पंथाच्या अर्ध्वयुंमध्ये रामानंदानंतर जर क्रम लागत असेल तर तो फक्त कबीरांचाच. त्यामुळे गुरुची वैशिष्टये कबीरमध्ये प्रकर्षाने जाणवतात. हिंदू आणि इस्लामी धर्ममार्तंडाच्या दोषांवर, विसंगतीवर, चारित्र्यहिनतेवर ते कडाडून हल्ला करीत राहिलेत. त्यांनी संताची धर्मपीठांची, पुरोहितशाहीची, मुल्ला-मौलवीची एवढी चिकित्सा केली की संपूर्ण पुरोहितशाहीच त्यांच्या विरुध्द उभी राहिली. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव हा संपूर्ण देशभर पसरला. वैदिक धर्म तत्वज्ञान, अल्ला आणि मुस्लिम कट्टरतावादाला विरोध करणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे हिंदू त्यांना नास्तिक म्हणू लागले तर मुस्लिम काफिर समजू लागले.

तत्कालीन समाजाच्या नौतिक अधःपतनाने कबीर फार अस्वस्थ होत असत. धर्मविषयक अज्ञान, अंधश्रध्दा, भेदाभेद, रुढी परंपरेचे प्राबल्य व परस्पर विषमतेविषयी ते सतत आपल्या दोहयातुन, प्रवचनातुन प्रबोधनाचे काम करीत असत. त्यामुळे जनजागृती होत राहिली. या त्यांच्या प्रयत्नातुनच त्यांना सामाजिक क्रांतीचे अग्रदूत व युगद्रष्टे कवी म्हणून मान्यता मिळाली. ते म्हणतात ”मुते इंद्रीय बांधे कान, कबीर कहे तेरा चोदू ज्ञान” ? आपल्या इंद्रीयाने मनुष्य लघवी करतो, परंतू कानाला फासी देतो, म्हणजेच जनेऊ (जानवा) बांधतो. तसे बघितले तर ३२ ग्रंथीने शरीर घाणेरडे आहे, पूर्ण शरीर दुर्गंधीयुक्त अपवित्र आहे. तरीदेखील लघवी करतेवेळी जानवे कानाला बांधणे, हे कुठले ज्ञान? ही तर अज्ञानता आहे. महात्मा ज्योतीबा फुलेंना देखील ब्राम्हण पंडीतांचे कपट कारस्थान उघडे पाडणारा पहिला पुरुष म्हणुन महात्मा कबीरांबद्दल आदर होता. कबीर म्हणतात, खाटीक तर जनावरांना कापतात पण पंडेपंडीत माणसा सारख्या माणसास जीवनतातून उठवतात त्यांना सर्वस्वी नागवतात. उच्च-निच तत्वाचं स्तोम माजऊन अवडंबर उभे करतात. माणसा-माणसांत भेद निर्माण करणाऱ्या ब्राम्हण पंडीतांना कबीर प्रश्न विचारतात. ते म्हणतात ”एक बुंद, एक मलमुतर, एक चाम, एक गुदा, एक ज्योती तौ उपजा कौन ब्राम्हण कौन सुदा”. एका बीजापासुन उत्पत्ती झालेली, जननी जठरीसारख्याच, यातनात झालेली वाढ आणि एकाच आत्मत्वाने सर्वांची जीवन ज्योती उजळलेली, मग हा ब्राम्हण व तो शुद्र हा भेद कसा? या अशा थोतांड कल्पनांना मुठ माती देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न होता.

 साधु संताच्या सहवासात राहणारे कबीर मुळातच आत्यंतिक वैराग्य वृत्तीमुळे संसारात कधीच रममाण झाले नाहीत. तरीदेखील आईच्या आग्रहाखातर त्यांनी लग्न केले. त्यांना पुत्रदेखील झाला त्याचे नांव त्यांनी कमाल ठेवले. परंतु तो त्यांच्या विचारांशी सहमत होवू शकला नाही तेव्हा मुलाविषयी दुःखोद्गार काढतांना ते म्हणतात ”डुबा वंश कबीर का उपजा पुत कमाल, हरी का सुमीरन छाडी के भारले आया माल”

आजही हिंदु, मुस्लिम, सिख इत्यादी धर्म पंथात कबीराला मान्यता आहे. जातीभेद विरहीत समाजाची स्थापना हा कबीराचा ध्यास व जीवनोध्येय होता. ते शिक्षित नसले तरीही साधुसंतांच्या सहवासातुन देशाटन त्यामुळे कबीराची दृष्टी चौफेर तल्लख बुध्दी याचा फायदा म्हणुन व्यक्ती व समाज या दोघांमध्ये समेळ घडवून आणण्यासाठी ते सदैव तयार असत परस्पर प्रेम व मनाचे पवित्र हे ईश्वर प्राप्तीचे माहेरघर होय अशी अगाध श्रध्दा त्यांची होती. ईश्वरावर अव्यभिचारी निष्ठा आणि मानव जातीविषयी समत्वभाव या गोष्टींचाच कबीराचा सर्वधर्म समन्वय सामावलेला आढळतो. त्यामुळे कोणीही त्यांना समाजवादाचे समर्थक म्हणू लागले. तर काही क्रांतीकारी कर्मयोगी म्हणत असत. त्यामुळे त्यांना कसलाही फरक पडत नव्हता परंतु एक महत्वपूर्ण संदेश त्यांनी संतांना दिला ते म्हणतात, साधु झाला तरी त्याने जीवन निर्वाहासाठी काही श्रमाचे काम केलेच पाहिजे, भीक मागून त्याने उदरपोषण करता कामा नये असा स्पष्ट आदेश होता.

”कबीरा ! हम पैदा हुए जग हसा हम रोये, एैसी करणी कर चले हम हसे जग रोये” आईच्या पोटी जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मग तो मुलगा असो की मुलगी या दुःखी जगाला बघून रडते. परंतु त्याचा परिवार फार आनंदी असतो, कारण जन्माला आलेला कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाचा नातू, कुणाचा पूतण्या, त्यामुळे परिवारातील लोक आनंदीत असणे स्वाभाविक आहे. परंतु या दुःखी जगाला, आनंदीत करण्याकरीता तो प्रयत्न करतो. लोकांची सेवा लोकांचे दुःख ते आपले समजुन त्यांची काळजी करतो त्यामुळे त्याचे नाव त्याची किर्ती दिगंत राहते. प्रत्येक व्यक्तीने शक्यतो चांगले काम करणे गरजेचे आहे. जेणेकरुन समाज मनावर त्याचा ठसा उमटलेला दिसेल.

मोको कहा ढुंडे रे बंदे, मै तो तेरे पास मे ना तिरथ मे, ना मुरत मे, ना एकांत निवास मे,
ना मंदिर मे, ना मस्जिद मे, ना काबे मे, ना कैलाश मे, मै तो तेरे पास मे बंदे मै तो तेरे पास

स्वतःच स्वतःला परमेश्वर ओळखून त्याकडे प्रार्थना करण्याचे बळ आपल्याला प्राप्त होईल तेव्हा हे सारे जग भयमुक्त होवून जाईल. कारण बाहेर शोधुन काही मिळणार नाही ते सत्य, शिव, सुंदर स्वतः मध्येच दडून आहे. ”दुर्बल को ना सताये, जाकी मोटी हाय, मरे बैल की चाम से, लोह भस्म हो जाय” दुर्बल असाहय गरिबाला कधीच त्रास देवू नये त्यांना त्रास असहय झाला तर मग ते शाप द्यायला मागे पूढे पाहात नाही. मेलेल्या गाईच्या चामडयाचा भाता हवा उत्पन्न करुन जसे  लोखंडाला वितळवून टाकतो. त्याप्रमाणेच शाप असतो जो दिसेनासा, फक्त त्याची तीव्रता आपल्याला जाणवते.

सृष्टीने सर्वांच्या शरीराची रचना तर एकसारखी केली आहे. मग हा ब्राम्हण आणि तो शुद्र हा भेद कसा ? किंवा कसा ओळखावा? म्हणून कबीर म्हणतात ”देखो चतुरावो की चतुराई, चार वर्ण आप बनावे, ईश्वर को बतलाई! वर्णाश्रम पध्दतीवर एवढी घणाघाती पण अल्पाक्षरी टीका सापडणे कठीण आहे. या संदर्भात आपल्या ब्राम्हण्याचा तोरा अथवा मुस्लिमपणाची शेखी मिरविणाऱ्यांना विचारलेला हा कबीराचा निरुत्तर करणारा सवाल. ते म्हणतात ”जो तु बामन बामनी जाया, तो आनबाट व्है क्यों नही आया? जो तु तुरक-तुरक की जाया, तो भितर खतना क्यों न करवाया ?”. ब्राम्हणच काय किंवा मुसलमान काय जनन मार्ग साऱ्यांचाच एकच आणि सुनतेत मुस्लिम पण साठवलेलं असेल तर अल्लाने जननी जठरातच उरकुन का जीवाला या जगात पाठवित नाही?

कबीर केवळ संत वा भक्त नव्हते त्यांच्या वेळचे ते क्रियाशील सुधारक हिंदु मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते आणि धर्मनिरपेक्ष अशा समाजाचे द्रष्टे होते. सर्वप्रकारच्या कर्मठ पणापासुन विमुक्त अशा आपल्या पंथाला ”सहजधर्मठ म्हटले आहे. या पंथातील निवौरता. भुतमात्र विषयी कणव, अविचल ईश्वर निष्ठा, निःस्पृह निर्भयवृत्ती, निर्मळ जीवन, सदाचार आणि साधु संताची संगती ही प्रमुख तत्वे आहेत.  त्यानुसार जे आचरण करील तोच खरा र्धमशिल मग जन्माने तो कोणत्याही जातीचा वर्णाचा किंवा धर्माचा का असेना. त्यांच्या शब्दांचे कवच टणक असले पाहीजे, त्यांच्या आत सुकोमल मानवतावादी अंतःकरणाचे दर्शन घडते. मुळातच कबीर विनम्र होते. साधुसंता विषयीचे त्यांचे हे उदगार पहा - कबीर चेरा संत का दसनी का परदास कबीर ऐसे व्है, ज्यु पाउतली घास. पायातळीच्या गवतासारखा स्वतःला संतचरण रज मानणारा हा कबीर सारा जन्म आत्मोध्दार इतकेच कबीराने लोकोध्दाराला महत्व दिले. कबीरांनी मानवा मानवात भेद नको आपण सर्व प्रभुची लेकरे आहोत गुणागोविंदयाने राहावे या जगात माणुसकी खेरीज अन्य दुसरे कोणतेही सत्य नाही याचे निरंतर शिकवण देणारा महान संत होता. त्याने समाजात एकोपा सामंजस्य, सद्भावना निर्माण केली अशा या महान संताला त्यांच्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम !  
प्रभाकर सोमकुवर, नागपूर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 रक्तदान करा..जीवाला जीवन द्या...