मना सज्जना लेखमाला (लेखांक ४४)

ज्या लोकांना भगवंताची आवड नाही, परमार्थाच्या मार्गावर चालण्याची इच्छा नाही, त्या लोकांच्या सहवासाला महत्त्व देणे, त्यांना आपल्या सुखाचा आधार मानणे सोडून द्यावे.त्यांच्यात भाव ओतणे थांबवावे. आपल्या मनातील सर्व भाव भगवंताकडे लावावा. तोच आपल्या सुखाचा शाश्वत आधार आहे. लोकांमध्ये सुख शोधण्याऐवजी एकांतात, म्हणजे स्वतःजवळच शोधण्याचा अभ्यास करावा. हे सुखासाठी अरण्य सेवीत जाणे आहे.

मागच्या श्लोकात समर्थांनी सांगितले ‘रघुनायकाविण बोलू नको.' आता सांगत आहेत, ‘जनीमौन्य मुद्रा धरावी.' मनुष्यप्राण्याला बोलण्याचे विशेष वरदान भगवंताने दिले आहे. वाणीची विशेष शक्ती मानवाकडे आहे जी इतर कोणत्याही प्राण्याकडे नाही. पण मनुष्यप्राणी वायफळ वापर करून ह्या शक्तीचा केवळ -हास करीत असतो. माणूस वैखरी वाणीने अखंड बोलत असतो. जेव्हा ती वाणी शांत असते तेव्हा मनातल्या मनात बोलणे सुरू असते. लोकांमध्ये बोलत असताना आवश्यक बोलणे खरे तर खूपच कमी असते. पण अनावश्यक बोलणे अमर्याद असते. यात प्रामुख्याने आत्मस्तुती असते, परनिंदा असते, दंभ असतो, उथळपणा असतो, अपशब्द असतात, असत्य असते. हे असे विपरीत काही बोलून वैखरीचा दुरुपयोग करण्याऐवजी समर्थ म्हणतात एक तर भगवंताबद्दल बोलावे किंवा काही बोलूच नये. मौन धारण करावे.

भगवंताबद्दल बोलणे म्हणजे भगवंताचे गुणगान करणे हा अर्थ आहेच पण दुसरा महत्त्वाचा अर्थ असा की व्यवहारातील आपल्या बोलण्यात सत्य असावे, पावित्र्य असावे, सदिच्छा असावी, गांभीर्य असावे, आनंद असावा. वैखरीने नेहमीच शुभ उच्चार करावेत. जी दुसऱ्याचे मन दुखावते ती वाणी अपवित्र आहे असे समर्थ म्हणतात. मौनाचा अर्थ वाणीने अशुभ, अपवित्र, अनावश्यक काहीही बोलूच नये. वाचेवर नियंत्रण असाही मौनाचा अर्थ आहे. भगवंताने मौनाला आपली विभूती म्हटले आहे. (भ.गी. १०ः ३८) मनातल्या मनात जे बोलणे सुरू असते त्याबाबतही अधिक सावध असावे. कारण जे बाहेर बोलता येत नाही ते मनात बोलले जाते. कायिक, वाचिक आणि मानसिक हिंसा असे तीन प्रकार असतात. पहिले दोन करण्यावर बंधन घालणे सोपे असते पण मानसिक दुष्कृत्य थांबवणे अवघड असते. मनातल्या मनातही कोणाचेही वाईट चिंतू नये. इथे मौनाचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो. विपरीत चिंतन थांबवण्याचा सोपा उपाय आहे भगवंताचे नामस्मरण. नामस्मरणाने आंतरिक मौन साधता येते. लोकांमध्ये वावरत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या संभाषणात भाग घ्यावा लागतो. तिथे जरुरी पुरते बोलावे. लोकांचे मन दुखावणार नाही, वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रसंगानुरूप लोकांना रुचेल आणि पचेल इतपत बोलावे. मात्र अंतरंगात भगवंताचे चिंतन अखंड असावे. सत्य, विवेक यांची जाणीव सतत जागृत असावी. ज्या ठिकाणी याच्या विरोधात संभाषण होत असेल त्या स्थानाचा त्याग करावा. त्या ठिकाणापासून, त्या लोकांपासून दूर राहावे. प्रत्येक वेळी शरीराने दूर जाणे शक्य नसते. तशी आवश्यकताही नसते. फक्त आपले मन त्या ठिकाणी आसक्त होणार नाही हे पहावे. तिथे गुंतू नये. म्हणजेच अशा लोकांमध्ये भावनिकरीत्या गुंतून त्यांच्यावर अवलंबून राहू नये.

ज्या लोकांना भगवंताची आवड नाही, ज्यांना परमार्थाच्या मार्गावर चालण्याची इच्छा नाही, त्या लोकांच्या सहवासाला महत्त्व देणे, त्यांना आपल्या सुखाचा आधार मानणे सोडून द्यावे. त्यांच्यात भाव ओतणे थांबवावे. आपल्या मनातील सर्व भाव भगवंताकडे लावावा. तोचआपल्या सुखाचा शाश्वत आधार आहे. लोकांच्या आवडीनिवडीप्रमाणे आपण वागावे किंवा आपल्या आवडीनुसार लोकांनी वागावे हा अट्टाहास सोडून द्यावा. त्या ऐवजी भगवंताला आवडेल असे वागण्याचा, अर्थातच शुद्ध, सत्य, धर्माने वागण्याचा प्रयत्न करावा. सुखासाठी आरण्य सेवीत जावे म्हणजे लोकांमध्ये सुख शोधत बसू नये. एकांतात ते शोधण्याचा, म्हणजे स्वतःजवळच ते शोधण्याचा अभ्यास करावा. स्वतःसोबत राहणे हा एकांतवास आहे.बाहेरचा सगळा गलबला बाहेरच राहू देणे तसेच मनातला गलबलाही बाहेर टाकणे आणि आंतरिक शांततेचा अनुभव घेणे हे अरण्यवास सेवन करणे आहे. आपल्या भौतिक गरजा कमी करणे हाही अरण्यवासाचा एक अर्थ आहे. जिथे गरजा, अपेक्षा कमी तिथे सुख जास्त हे साधे गणित आहे. जिथे आहोत तिथेच राहून वर्ण व आश्रमानुसार जी कर्मे आवश्यक आहेत ती सर्व विधिनिषेध पाळून करत असतानाच, सर्वात राहूनही मनाने अलिप्त होणे, शांत होणे, हाच अरण्यवास आहे आणि वाचेचा संयम हेच मौन आहे. हेच तर साधायचे आहे.
जय जय रघुवीर समर्थ - सौ.आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शोध कशापायी। मी तुमच्या ठायी