कापडी पिशवी प्रकल्प - अर्थात आजीबाईचा बटवा..

शनिवारी एक जूनला आमचा हा प्रकल्प सुरू झाला. शिवणाऱ्याने पिशव्या शिवल्या. विकणाऱ्याने पिशव्या विकल्या! दिवसाढवळ्या जे स्वप्नं पाहिलं होतं.. ते प्रत्यक्षात येत होतं.. आता पाच लोक पिशव्या शिवत आहेत...पाच लोक पिशव्या विकत आहेत. माझा एक अपंग माणूस आहे, पूर्वी तो वर्षानुवर्षे रस्त्यावर पडून होता..त्याला नीट करून, आता अपंगाची सायकल दिली आहे..सायकलवर पुणेरी टोमणे अडकवले आहेत..मला अभिमान हा की, याच्याकडून मला कोणतीच अपेक्षा नव्हती, तरीही सर्वात जास्त व्यवसाय तोच करतो...! तर, आजीबाईचा हा बटवा सध्या दहा लोकांचे कुटुंब चालवत आहे !

हुश्श्श..! चालू झाला एकदाचा कापडी पिशवी प्रकल्प...!! खूपदा सांगितलं आहे तरीही पुन्हा सांगतो...रस्त्यावरील लोकांना भीक देणाऱ्या माझ्या भाऊ आणि बहिणींनो...मी आपल्या पायावर डोकं टेकवून सांगतो, की लोकांना भीक देऊ नका...! यांना आपण कामाला लावू....तुमच्याकडे काही काम असेल तर यांना द्या..! काही काम नसेल तरी हरकत नाही पण, यांना भीक नका देऊ...दोन पाच रुपयात पुण्य विकत मिळत नाही...! मी यांना शासकीय नोकरी देण्याचा प्रयत्न करतोय परंतु, शासनाच्या कोणत्याही योजनांमध्ये काही कागदपत्रे नसल्यामुळे हे लोक बसत नाहीत.

समाजातील अनेक लोक यांच्यासाठी मला नोकऱ्यांची ऑफर देतात, परंतु माझ्या लोकांकडे ते कौशल्य नाही किंवा शारीरिक क्षमता नाही... आणि म्हणून, कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त मोबदला देणारा कोणता व्यवसाय आपण या लोकांना देऊ शकू? याचा विचार मी रोज करत असतो... ! असो...समाजाने गोरगरिबांना वाटण्यासाठी दिलेल्या साड्यांचा ढीग माझ्या घरात आहे. या साड्यांची बोचक्यावर बोचकी बांधून मी घरात ठेवली आहेत. चालताना चुकून एखाद्या बोचक्याला माझा धक्का लागतो.. मी धड; पडत नाही... परंतु पुढे जाऊन कुठेतरी धडपडतो....घरातल्या एखाद्या वस्तूला माझा हात लागतो....ती वस्तू खाली पडते... आणि प्रकट दिन असल्याप्रमाणे घरातली गृहलक्ष्मी न जाणो कुठून तरी प्रकट होते...हातात लाटणे आणि चेहऱ्यावर रुद्रावतार!

यानंतर ती माऊली, काम वाढवलं म्हणून, पुढचे दोन तास मंजुळ स्वरात माझ्या घराण्याचा उद्धार करणार, हे मला माहीत असतं आणि म्हणून मी, समस्त नवरे जातीचा मान राखून, आपण जन्मजात बहिरे आहोत असं दाखवून, गुपचूप घराबाहेर पडतो आणि भीक मागणाऱ्या लोकांमध्ये फिल्डवर जातो!  असाच एके दिवशी, फिल्डवर गेलो असता, एका भिक मागणाऱ्या ताईने ‘मला शिलाई मशीन घेऊन द्याल का असं विचारलं ?' कान टवकारुन, मी तिला म्हणालो, ‘बाई, काय करशील गं तू मशीन घेऊन दिल्यानंतर ?' ती म्हणाली, ‘साड्यांना फॉल पिको करेन, कपड्यांची किरकोळ दुरुस्तीची कामं करेन ...आणि मला साड्या किंवा मोठे कापड मिळाले तर मी या कपड्यांच्या पिशव्या शिवेन, सासू बसून भीक मागते तिला बसल्या बसल्या या पिशव्या रस्त्यावर विकायला लावेन... तेवढाच आमच्या कुटुंबाला हातभार!'

हाच तो शंभरावा ठोका...! मला आठवतं, त्यावेळी मी खूप जोर जोरात हसलो होतो... मला मार्ग मिळाला होता...! घरात पडलेल्या साड्या, या ताईला किंवा ज्यांना शिलाई काम येतं, अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना देऊन पिशव्या शिवायला लावल्या तर ? या ताईच्या सासूसारखे अनेक लोक नुसते बसलेले असतात...यांना या पिशव्या बसल्या बसल्या विकायला लावल्या तर? भीक मागणाऱ्या लोकांसाठी कमी खर्चात, कमी कष्टात जास्त मोबदला मिळवून देणारा हा मोठा व्यवसाय ठरेल !मला मार्ग सापडला... आणि तो आमच्या एका याचकानेच दाखवला. एक गट बसून पिशव्या शिवेल, दुसरा गट या पिशव्या विकेल... असा जर एखादा प्रकल्प सुरू केला, तर भीक मागणाऱ्या लोकांना एक व्यवसाय तर मिळेलच....परंतु आमच्या गृहलक्ष्मीच्या तलवारीसम भासणाऱ्या लाटण्यापासून माझी सुद्धा सुटका होईल... माझ्या घराण्याचा उद्धार यानिमित्ताने टळेल ....असाही एक स्वार्थी विचार मनात तरळून गेला !

या विचाराने मी सुखावलो...पण, आमच्या भीक मागणाऱ्या लोकांकडून पिशव्या विकत घेणार कोण ? मग आमच्याकडून पिशव्या विकत घ्या, भीक नको काम द्या अशा अर्थाचा एखादा बोर्ड तयार करून विकणाऱ्या लोकांच्या गळ्यात लटकवू... असा विचार मनात आला.  पण उगीच कोरडा काहीतरी मेसेज तयार करण्यापेक्षा, पुण्यातल्या लोकांशी इमान राखून...पुणेरी टोमणे का तयार करू नयेत? असं डोक्यात आलं...पुणेरी टोमण्यांच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या वापरणे सोडून द्या आणि आमच्या कापडी पिशव्या विकत घ्या अशा अर्थाचा मेसेज लिहिला तर समाज प्रबोधनसुद्धा होईल आणि आमच्या पिशव्यासुद्धा विकल्या जातील, असा विचार डोक्यात आला. पुणेरी टोमणे गुदगुल्या करतात, पण ते टोचत नाहीत, बोचत नाहीत! आपोआप चेहऱ्यावर स्मितहास्य येतं... आणि जे काही सांगायचं आहे ते बरोबर योग्य ठिकाणी घुसतं...आणि मग पहिलाच टोमणा सुचला... ‘सासूबाईंच्या सारख्या सूचना आणि सुनबाईंच्या सूचना नको असतील तर प्लास्टिक पिशवी वापरणे सोडून द्या आणि आमच्या कापडी पिशव्या वापरा...' पाठोपाठ दुसरा सुचला...‘प्लास्टिकची पिशवी म्हणजे गर्लफ्रेंड दिखावू, कापडी पिशवी म्हणजे सुंदर, छान बायको टिकाऊ...'  ‘प्लास्टिक पिशवी वापरणे सोडून द्या आणि आमच्या कापडी पिशव्या वापरा!' मला आणखी टोमणे हवे होते... मग डोक्यात सतत तेच विचार ... पण, या दोन शिवाय गाडी काही पुढे जाईना....आणि टोमणेपण काही केल्या सुचेनात!

एकतर मी सातारी... धीर धरायची आम्हासनी सवय नाही...! हिकडं भाकरी थापली, की तिकडं ती तोंडात गेलीच पायजे...काही केल्या हे गणित जमेना...तरीही सतत विचार सुरू होते....मोटरसायकल चालवताना एखादा टोमणा सुचला की गाडी बाजूला घेऊन पटकन मिळेल त्या कागदावर तो टोमणा लिहून घ्यायचो... चार आठ दिवसात बरेच टोमणे सुचले...मग माझ्या पुस्तकाच्या डिझाईन पासून प्रिंटिंगपर्यंत सर्व काही करणारी, पद्मिनी खुटाळे हिला मी माझी आयडिया सांगितली, तिने कागदावर टोमण्यांना डिझाइनचं रूप दिलं...‘आम्ही चक्क कॉपी करतो' असं म्हणणाऱ्या डीजी कॉपीयर्स यांनी माझ्या या टोमण्यांची मला चक्क कॉपी काढून दिली. यानंतर, पिशव्या शिवू शकतील असा एक गट तयार केला... पिशव्या विकू शकतील असा दुसरा गट तयार केला... आधी सर्व अंदाज घेतला, (म्हणजे होमवर्क केला...लहानपणी कधी केला नाही, परंतु आत्ता मात्र केला ) आणि मगच होमवर्क करून माझा विचार तुम्हा सर्वांना सांगितला! मला वाटलं नव्हतं पण, माझ्या एका साध्या छोट्या विचाराला तुम्ही सर्वांनी इतकं उचलून धरलं की काय सांगू ? कुणी शिलाई मशीन दिल्या, कुणी कपडे, कुणी आर्थिक मदत...आणि काय काय सांगू ? माझ्यावर माया करणाऱ्या कितीतरी आज्यांनी फोन करून या प्रकल्पाची आणि माझी स्तुती केली.

ही पण एक प्रकारे मदतच आहे... (यावेळी भारावून मी त्यांना म्हणालो होतो, प्रकल्पाविषयी लिहीन तेव्हा आजी तुमचं नाव नक्की लिहिणार आहे...त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, ‘नाव लिही,  पण आमच्या नावापुढे आजी लावू नकोस... ताई म्हण हां...' (Ladies are Ladies) यातून एक झालं... यामुळे माझं मनोबळ आणखी वाढलं... आपण योग्य रस्त्यावर आहोत याची खात्री पटली...! असो. यावरून एक आठवलं.. केलेली स्तुती कधी लक्षात ठेवायची नसते. पण स्तुती करणाऱ्या व्यक्तीला मात्र विसरायचं नसतं ! स्तुती आठवली की अहंकार वाढतो. स्तुती करणारी व्यक्ती आठवली की कृतज्ञता. मी कृतज्ञ आहे या आजीबाई ताईंचा! यानंतर शिवणाऱ्या गटाला पिशव्या शिवायला लावल्या, विक्री केल्यानंतर, ज्याच्या हातात या पिशव्या पडतील, त्याला या पिशव्यांच्या विक्रीमागचा हेतू कळावा, यासाठी एक छोटासा मेसेज पलेक्सवर टाईप करून पिशवीवर शिवून घेतला. यानंतर विकणाऱ्या गटाला बोलावून त्यांच्या गळ्यात पुणेरी टोमण्याचे बोर्ड घातले...हातात पिशव्या दिल्या आणि त्यांना सांगितलं, ‘या पिशव्या आता विकायच्या. लक्ष्मी रोड, तुळशीबाग, बाजीराव रस्ता, कॅम्प अशा गर्दीच्या ठिकाणी फिरत रहा. गळ्यात अडकवलेले बोर्ड लोकांना दिसायला हवेत... येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पिशव्या घेण्यासाठी विनंती करा' यातून जे पैसे येतील ते निम्मे पैसे तुम्ही घ्यायचे,  उरलेले निम्मे मला द्यायचे, म्हणजे मी हे निम्मे पैसे शिवणाऱ्या व्यक्तीला देईन.'

यातून एकाने कळीचा मुद्दा विचारला, ‘सर एक पिशवी कितीला विकायची ?'
बापरे... मी हा विचारच नव्हता केला... एक पिशवी कितीला विकायची.? खरंच पिशवीची किंमत काय ठेवायची? समाजाने दिलेल्या कपड्यातून मी या पिशव्या शिवल्या होत्या. कुणी देवीला होतील म्हणून ठेवलेल्या नव्या साड्या मला दिल्या होत्या. लेकीच्या लग्नात मिळालेल्या साड्या मला दिल्या. कुणी पडद्याचे कापड दिले. वडिलांच्या पंचाहत्तरी निमित्त/वाढदिवसानिमित्त आलेले सुटिंग शर्टिंग आणि सफारीचे कापड मला अनेकांनी दिले. कुणी घरात असलेल्या कपड्यांच्या रात्रंदिवस बसून स्वतः पिशव्या शिवल्या होत्या...त्या मला दिल्या...अक्षरशः कुणी कुणी पाचशे रुपये मीटरचे कापड विकत घेऊन मला तागेच्या तागे दिले होते. ठेवणीतल्या साड्या आता घालून मी या वयात कुठे मिरवणार आहे ? असं म्हणत कितीतरी आज्यांनी ठेवणीतल्या साड्या मला दान केल्या. हे प्रेम म्हणू ? माया म्हणू ? विश्वास म्हणू ? की समाजाबद्दलची कृतज्ञता म्हणू? समाजाने दिलेल्या या प्रेमाची, मायेची, विश्वासाची आणि कृतज्ञतेची आम्ही पिशवी तयार केली...पण त्याची किंमत ठरवणारा मी कोण ? माझी तितकी पात्रता नाही...आमचा हा प्रकल्प म्हणजे नुसता प्रकल्प नाही, तर डोंगरावर पोहोचलेल्या माणसांनी, पायथ्याशी असलेल्या माणसांना, माणुसकीने केलेली मदत आहे!! आमची पिशवी म्हणजे पिशवी नाही... आजीबाईचा हरवलेला बटवा आहे तो...! या बटव्यामध्ये प्रेम, माया, विश्वास आणि कृतज्ञतेचा, आजीच्या खरबरीत हाताच्या मायेचा स्पर्श आहे! आणि मग खूप विचार करून ज्यांनी मला पिशवीची किंमत विचारली होती त्यांना सांगितलं..

‘मामा, या प्रत्येक पिशवीची किंमत अमूल्य आहे आणि या पिशवीची किंमत ठरवण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.' जी व्यक्ती तुम्हाला या पिशवीची किंमत विचारेल..त्याच्याशी थोडसं बोला, त्यांना जाणीव करून द्या, पिशवीचं कापड कुठून आलंय..कुणी दिलंय ? देणाऱ्याची भावना काय आहे ? कुणी शिवलंय... आपण कशासाठी या पिशव्या विकतोय?' वगैरे.... वगैरे !  माझी खात्री आहे, पिशवीवरचा मेसेज वाचून, तुमचं बोलणं ऐकून, एखादी संवेदनशील व्यक्ती या पिशवीचं मोल बरोबर ठरवेल...आपल्याला किंमत नकोच आहे.. हवंय ते समाजाच्या विश्वासाचं मोल! किंमत ठरवण्याची पात्रता आपली नाही; समाजाने दिलेल्या गोष्टीचे मोल समाजच करेल!' यानंतर ती व्यक्ती पिशवी विकत घेतल्यानंतर, जो निधी देईल, तो प्रसाद समजून माथ्याला लावा! प्रसादाची चिकित्सा, किंमत आणि मोल करायचं नसतं कधीच!'

माझ्या लोकांनाही ते पटलं...बरोब्बर शनिवारी एक जूनला आमचा हा प्रकल्प सुरू झाला.... शिवणाऱ्याने पिशव्या शिवल्या... विकणाऱ्याने पिशव्या विकल्या... ! दिवसाढवळ्या जे स्वप्नं पाहिलं होतं... ते प्रत्यक्षात येत होतं...! आता पाच लोक पिशव्या शिवत आहेत...पाच लोक पिशव्या विकत आहेत. माझा एक अपंग माणूस आहे, पूर्वी तो वर्षानुवर्षे रस्त्यावर पडून होता..त्याला नीट करून, आता अपंगाची सायकल दिली आहे...सायकलवर पुणेरी टोमणे अडकवले आहेत.. मला अभिमान हा की, याच्याकडून मला कोणतीच अपेक्षा नव्हती तरीही सर्वात जास्त व्यवसाय तोच करतो...! तर आजीबाईचा हा बटवा सध्या दहा लोकांचे कुटुंब चालवत आहे! या प्रकल्पाची माहिती मिळाल्यानंतर, अनेक लोकांनी माझ्याकडे पिशव्यांची डायरेक्ट ऑर्डर द्यायला सुरुवात केली! सुरुवातीला अनेक लोकांना, माझ्या लोकांनी तयार केलेल्या या पिशव्या मी घरपोच पाठवल्या...पिशव्या पाहून, तुम्हाला द्यायचे ते पैसे द्या, असे म्हणालो...त्यांनी त्याचे योग्य ते...नव्हे, जास्तीचेच मोल दिले...! पण तरीही मनामध्ये एक सल होता.. हे पैसे मिळाल्यानंतर, मनात अनेक विचार सुरू झाले.. हे विचार मी अत्यंत नम्रपणे आपल्यासमोर मांडत आहे, हा विचार चुकीचा असेल तर मला जरूर कळवा..माझ्याकडून जर कुणी अशा डायरेक्ट पिशव्या विकत घेतल्या, तर मिळालेल्या पैशातून मी निम्मा पैसा पिशव्या शिवणाऱ्या व्यक्तींना मोबदला देऊ शकतो..पण उरलेला निम्मा पैसा मी कोणाला देऊ ? पिशव्या विकून संस्थेसाठी देणगी जमा करणे हा हेतूच नाही! आज पाच लोक भीक मागणे सोडून इकडे तिकडे फिरून गळ्यात पाटी अडकवून पिशव्या घेण्याविषयी, लोकांना विनंती करून पिशव्या विकत आहेत. त्यांना त्या बदल्यात पैसे मिळणार आहेत. त्यांचं कुटुंब चालणार आहे.  भीक मागणे सोडून त्यांनी कायम हेच करावे, अशी माझी इच्छा आहे. त्यांना कामाची / कष्टाची सवय लागावी. त्यांच्याकडे पाहून इतर याचकांना प्रेरणा मिळावी. उद्या पाचाचे ५० लोक व्हावेत..या ५० लोकांनी भीक मागणे सोडावे आणि आम्हालासुद्धा पिशव्या विकायला द्या, म्हणून माझ्याकडे पिशव्या मागाव्यात...मी त्यांना माझ्याकडच्या पिशव्या विकायला देईन आणि यातून ५० लोकांची/कुटुंबांची उपजीविका चालेल. हा मूळ हेतू आहे ! परस्पर जर मी माझ्याकडूनच पिशव्या विकल्या तर शिवणाऱ्या व्यक्तीला पैसे मिळतील, परंतु पिशव्या विकणारे ५० लोक मग कसे तयार होणार? आणि म्हणून अत्यंत नम्रपणे मी सांगू इच्छितो की, तयार झालेला हा आजीबाईचा बटवा भीक मागणाऱ्या लोकांनी कष्ट करून, फिरून विकावा, त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांनी चालवावा...याचसाठी ठेवायचा असं ठरवलं आहे!

(हा मेसेज तुम्हाला मिळण्यापूर्वीच ४५,००० पिशव्यांची ऑर्डर माझ्याकडे आली आहे... किंमत तुम्ही सांगाल ती.. अशी प्रेमळ सूचनासुद्धा आहे, परंतु मी वरील विचार त्यांना सांगून, अत्यंत नम्रतेने नकार कळवला आहे) ही तर सुरुवात आहे... जरा जोर लावला तर, आणखीही खूप ऑर्डर्स मिळतील, अशाप्रकारे निधी मिळत गेला तर संस्था उत्तम प्रकारे चालेल यात वादच नाही. पण मला संस्था नाही, तळागाळात पडलेल्या रुतून बसलेल्या माझ्या भीक मागणाऱ्या समाजाला चालवायचं आहे, चिखलातून त्यांना उठवून उभं करायचं आहे! डायरेक्ट पिशव्या विकून, भविष्यातल्या माझ्या ५०/५००/५००० लोकांच्या तोंडचा घास मला हिरावून घ्यायचा नाही! आणि म्हणून मी कोणालाही परस्पर पिशव्या न विकण्याचा निर्णय घेतला आहे... ! मी चुकत असेन तर जरूर कान पकडावा... व्यवहारात मी जरा कच्चाच आहे. याचकांकडून पिशव्या शिवून घेणे आणि त्यांच्याचकडून विकणे हा माझ्यासाठी व्यवसाय किंवा धंदा नाही. हा प्रकल्प म्हणजे माझ्यासाठी, माझ्यापुरती मी मांडलेली पूजा आहे..माझे लोक या प्रकल्पाविषयी लोकांना बोलून माहिती देतील, कपडे देणाऱ्या व्यक्तीच्या भावना बोलून दाखवतील, प्लास्टिक पिशव्या वापरू नका म्हणून समाजाला विनवतील ...माझ्या लोकांनी  केलेली ही आरती आहे असं मी समजतो! या प्रकल्पातून मिळालेल्या निधीमधून माझे भीक मागणारे लोक, आपल्या नागड्या उघड्या लहान मुलांच्या तोंडात सन्मानानं घास भरवतील तोच माझ्यासाठी नैवेद्य असेल. म्हाताऱ्या आईला याच पैशातून ते मानानं साडीचोळी करतील तीच माझ्यासाठी नवरात्र असेल! याच पैशातून त्यांच्या घरातली चूल पेटेल...तीच माझ्यासाठी दिवाळीची पणती असेल!त्यांच्या घरातली लक्ष्मी उंबऱ्याच्या आत, ताठ मानेनं, दिमाखात डोक्यावर पदर घेऊन उभी असेल... तीच माझी गुढी आणि तोच माझा पाडवा!

अशा भरल्या घरात मी कधीतरी जाईन आणि तिथली चिल्ली पिल्ली पोट्टी...मामा मामा म्हणत माझ्या अंगाखांद्याशी झोंबतील... माझ्या ताईच्या घरची ही कार्टी ‘मामाच्या गावाला जाऊया' म्हणत मला त्रास देतील... या पिल्लांना कसं सांगू ?  मामाचा गाव हाच आहे गड्यांनो...!

आमचा हा दंगा बघून खाटेवर पडलेली म्हातारी खोकत खोकत मला म्हणेल... ‘भयनीच्या घरी आलाच हायस तर जीवून जा बाबा ...' मी म्हणेन, ‘नगो म्हातारे प्वॉट भरलंय माजं....' म्हातारी मग लटक्या रागानं, ‘मुडद्या' म्हणत माझ्या तोंडात गुळ शेंगदाण्याचा तोबरा भरंल... मला मिळालेला प्रसाद हाच तो!! आता अजून कसली पूजा मांडू ? कुठे अभिषेक करू? आजपर्यंतच्या अनुभवावरून सांगतो...आता तुमचा पुढचा प्रश्न असेल,  ‘डॉक्टर आम्ही यात काय आणि कशी मदत करू शकतो?' चला तर आज खरंच मागतो... आजपर्यंत तुम्ही इतकं काही दिलं आहे, की माझी झोळी पूर्णतः भरून गेली आहे... मी तुमच्याकडे काही मागावं असं तुम्ही काही शिल्लकच ठेवलं नाही...! तरीही काही द्यायचं असेल तर माझ्या या पाच कष्टकरी लोकांचे ५०.. नव्हे ५००... नाही नाही ५००० लोक होऊ देत....असा आशीर्वाद द्या... ! कधी बोललो नाही, परंतु खूप वेळा नाउमेद होतो मी... अशावेळी ‘चल रे,' म्हणत पाठीवर एक हलकीशी थाप द्या...! थकून कधी गुडघ्यावर बसलोच तर, उठून उभं राहण्यासाठी ‘उठ रे...' म्हणत साद द्या...! मी रेडा होवून नुसता वेद म्हणतो..त्यावेळी तुम्ही दुसऱ्याची वेदना जपता...मी दान मागत झोळी घेवून फिरतो...त्यावेळी तुम्ही पसायदान जगता...आता काय मागु माऊली तुमच्याकडे ? आपल्यापुढे नतमस्तक मी... कृतज्ञ मी 


लेखनकाल : ५ जून २०२४
-डॉ अभिजित सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नुकसानदायक क्रोधाला आवरा